वेंगुर्ले (सिंधुदुर्ग), पुढारी वृत्‍तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील दुकानवाड परिसरात लम्पिसदृश्य आजाराने एका शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या ४ दिवसात ७७ लम्पिसदृश्य जनावरे आढळली असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाने दिली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या गोधनाची विशेष काळजी घ्यावी,असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा लम्पी आजारापासून दूरच होता. याबाबत पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली होती. परंतु गेल्या ४ दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७७ लम्पिसदृश्य जनावरे आढळून आली आहेत. यामधील ४२ जनावरे उपचाराने बरी झाली आहेत व ३५ जनावरांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये कणकवली, वैभववाडी, कुडाळ व सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक लम्पिसदृश्य जनावरे आहेत. वेंगुर्ले तालुक्यातही अशी सदृश्य जनावरे आढळून आली आहेत.त्यामुळे या रोगाचा आपल्या जिल्ह्यातही शिरकाव होतोय.

याबाबत लक्षणे आढळल्यास प्रामुख्याने गोमाशा निर्मूलनासाठी औषधोपचार करुन घ्यावेत. निरोगी जनावरे व आजारी जनावरे एकत्र ठेवू नयेत. तसेच त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून लसीकरण करुन घ्यावे,असे आवाहन करण्यात आले आहे. लम्पिसदृश्य आजाराचा जिल्ह्यात शिरकाव झाल्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागामार्फत ठिकठिकाणी पशुधनाची पाहणी करण्यात येणार आहे. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा 

लाचप्रकरणी महिला पोलीस निरीक्षकासह पतीला अटक

हिंगोली : भरधाव ट्रकच्या धडकेत तरुण जागीच ठार

औरंगाबाद : ‘बॉयफ्रेंड’वरून तीन विद्यार्थिनींमध्ये फ्रिस्टाइल हाणामारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here