रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  तातडीने वैद्याकीय सेवा पुरविण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीत तातडीने मदतकार्यासह बचावकार्य पुरविण्यासाठी कोकणातील 47 तालुक्यांत हेलिपॅडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने कोकणात मान्यता दिलेली सी प्लेन सुविधाही लवकर सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हेलिपॅडसाठी प्रशासनाला जागा निश्चितीच्या सूचना करताना सी प्लेन सुविधेची चाचपणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

कोरोना काळात वैद्यकीय यंत्रणेवर असलेला ताण लक्षात घेऊन कोकणातील दुर्गम भागात वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य सुविधेअंतर्गत कोकणातील पाच जिल्ह्यांतील 47 तालुक्यांमध्ये हेलिपॅडची सुविधा उपलब्ब्ध करण्यात येणार आहे. तसेच गेली अनेक वर्षे कोकणातील जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होत आहे. अशा नैसर्गिक आपत्तीत बचावकार्य तातडीने करण्यासाठी आणि मदत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी या हवाई सेवेचा उपयोग करण्यात येणार आहे.
यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यासाठी जाागेची निश्चिती करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करताना गंभीर रुग्णाला एअर लिफ्ट करण्याकरिता आणि इतर वैद्यकीय मदतीसाठीही या हेलिपॅडचा उपयोग करण्यात येणार आहे.

कोकणच्या समुद्र किनारपट्टी भागात ‘सी- प्लेन’ सुविधेद्वारे पर्यटन. प्रवासी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे चाचपणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या योजनेत ठाणे जिल्ह्यात सात, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी आठ, रत्नागिरीत 9 आणि सर्वात जास्त रायगड जिल्ह्यात 15 ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here