आचरा; पुढारी वृत्तसेवा :  आचरा येथील मत्स्य उद्योजक मुजफ्फर ऊर्फ चावल बशीर मुजावर यांची ‘अलसभा’ ही मासेमारी नौका खलाशांसह अरबी समुद्रातून नाट्यमयरीत्या 5 जणांसह बेपत्ता झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीपासून घडली आहे. तळाशील समुद्रात मासेमारी करत असताना अचानक ‘अलसभा’ची सिग्नल यंत्रणा बंद होऊन ती गायब झाली. आचरा पोलिस ठाण्यात मासेमारी नौका व खलाशी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

आचरा बंदरातून रविवारी दुपारी तळाशील ते देवबागच्या दिशेने अरबी समुद्रामध्ये हुक फिशिंगसाठी ‘अलसभा’ ही नौका गेली होती. या नौकेवर तांडेल करीअप्पा मर्नल, पपन्ना गोशी (दोन्ही रा. कोप्पल, कर्नाटक), तर कर्फुला मिन्झ, प्रमोद किसान, राजेश मिन्झ (तिघेही रा. उडीसा) असे पाच जण होते. रविवारी मध्यरात्री तळाशील ते देवबाग समुद्रात ही नौका मासेमारी करताना मुजावर यांच्या दुसर्‍या नौकेतील खलाशांना दिसली. मात्र, त्यानंतर त्या नौकेवरील सिग्नल दर्शवणारे दिवे बंद झाले आणि नौका गायब झाली.

नौकामालक मुजावर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार नौका बेपत्ता असल्याची नोंद घेण्यात आली आहे. याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिस, सागरी पोलिस तसेच कोस्ट गार्ड विभागाकडून तपास सुरू आहे. खलाशांकडे असलेल्या मोबाईलद्वारे लोकेशन तपासले जात आहे. आवश्यकता वाटल्यास हेलिकॉप्टरच्या साहाय्याने तपास होईल, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here