
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय कोर्समध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवत डॉक्टरकडून ऑनलाईन पद्धतीने सुमारे 15 लाख 10 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणातील संशयिताला शहर पोलिसांनी अटक केली असून बुधवारी त्याला न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. फसवणुकीची ही घटना जून 2019 ते 10 मे 2022 या कालावधीत घडली होती.
महेश विठ्ठल अदाते (वय 42, रा. कसपटे वस्ती, ता. वाकड, जि. पुणे) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात डॉ. अमोल वासुदेव झोपे (वय 39, रा. पर्णिका एम्पायर आरोग्य मंदिर, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार जून 2019 ते 10 मे 2022 या कालावधीत महेश अदाते याने त्यांना ‘डिप्लोमा इन डर्माटोलॉजी अॅन्ड वेनेरिऑलॉजी’ या कोर्सचे प्रवेश करून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्या नंतर आपल्या बँक खात्यावर आरटीजीएस, आयएमपीएस व गुगल पेद्वारे 12 लाख 60 हजार रुपये जमा करुन घेतली. तसेच आपल्या वडिलांच्या खात्यावर 2 लाख 50 हजार असे एकूण 15 लाख 10 हजार रुपये घेतले. परंतू, पैसे घेऊनही वैद्यकीय कोर्समध्ये प्रवेश मिळवून न देता डॉ. झोपे यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात दि. 10 मे 2022 रोजी तक्रार दिली होती.
या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज भोसले यांनी तपास करुन संशयित महेश अदातेला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याची रवानगी 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत करण्यात आली.