गोवा हे एक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून प्रख्यात असून येथे व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.कोकण रेल्वेने गोव्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले असून येणार्या पंधरा महिन्यात कोकण रेल्वेच्या मार्गाचे विद्युतीकरण केले जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केली.डिझेल इंजिन द्वारे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी यापुढे विजेवर चालणारे इंजिन कोंकण रेल्वेसाठी वापरले जाईल, अशी माहिती गोयल यांनी शुक्रवारी मडगावात पत्रकारांशी बोलताना दिली.
रेल्वे मंत्री गोयल यांनी मडगावच्या कोंकण रेल्वे स्थानकाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.गोव्यात प्रदूषण रहित वातावरण राहावे,यासाठी सर्व जण प्रयत्न करत आहेत.रेल्वे त्यासाठी आपले योगदान देणार असून डिझेलच्या इंजिनचे प्रदूषण पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी कोकण रेल्वेच्या मार्गाचे विद्युतीकरण केले जाणार आहे,असे गोयल म्हणाले.
रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जाणार आहे, स्वच्छतागृहे नवीन बांधली जाणार आहेत.रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेकडे आपण लक्ष ठेवून आहोत.शिवाय येणार्या काळात आणखी नवीन रेल्वे गोव्यात दाखल होणार आहेत. जेणेकरून वर्षभर गोव्यात पर्यटक येऊ शकतील.रेल्वे मार्गात येणार्या निसर्गरम्य घाटांचे पर्यटकांना दर्शन घेता यावे ,यासाठी रेल्वेला काचेचे डबे बसवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे,असेही मंत्री गोयल म्हणाले.
काही जण रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणाच्या विरोधात लोकांना भडकावत असून त्यांच्यामुळेच रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम काही ठिकाणी रखडलेले आहे. रेल्वेच्या मार्गाचे विस्तारीकरण झाल्यास गोव्यालाही त्याचा फायदा होणार आहे.ज्या लोकांच्या जमिनी रेल्वेच्या कामासाठी जाणार आहेत त्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे ,असे गोयल म्हणाले.
पत्रकारांनी गोयल यांना ऐतिहासिक वारसास्थळांविषयी विचारले असता रेल्वेच्या मार्गासाठी ऐतिहासिक वारसास्थळे हटवावी लागतील, असा प्रकार गोव्यात तरी समोर आलेला नाही ,असे त्यांनी सांगितले.
रेल्वे मंत्री गोयल यांनी यावेळी मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर,मिलिंद नाईक व कोकण रेल्वेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की गोवा हा शांतताप्रिय प्रदेश असून गोव्याला सुरक्षेच्या दृष्टीने धोका नसल्याचे ते म्हणाले. रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण राज्य सरकार आणि रेल्वे पोलिसांशी चर्चा करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.रेल्वे स्थानकाची स्वच्छता राखण्यात आलेली आहे. सौचालये,रेस्टॉरंट,स्वच्छ आहेत.कोंकण रेल्वे स्थानकाची व्यवस्था पाहून आपण समाधानी झालेलो आहे. मारियो मिरांडा यांचे पेंटिंग आणि चार्ल्स कुरय्या यांची वास्तुरचना कोकण रेल्वे स्थानकाचे सौंदर्य आणखीनच खुलवत आहे,अशी प्रशंसा गोयल यांनी केली.