जालगाव : पुढारी वृत्तसेवा : पुणे येथून दापोली लाडघर बीच येथे पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. 4 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

मयूर दीपक चिखलकर (वय 25, रा. विश्रांतवाडी, पुणे) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयूर पुण्याच्या आयटी पार्कमध्ये कामाला होता. तो मित्रांसह दापोली तालुक्यातील लाडघर बीचवर फिरायला आला असता सर्व मित्र दुपारी तीनच्या सुमारास समुद्राच्या पाण्यात अंघोळ करण्यासाठी उतरले. मात्र, मयूर चिखलकर हा समुद्रात खोलवर गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला व लाटेसह आत पाण्यात ओढला गेला. घटनास्थळी आरडाओरड झाल्यावर स्थानिकांच्या मदतीने त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत मृत्यू झाला होता. या बाबत दापोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here