रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी यांना गेल्या शनिवारी नोटीस देऊन सोमवारी (दि.5) जबाबासाठी हजर राहण्यास सांगितले. परंतु, इतक्या कमी वेळात सनदी लेखापाल (सी.ए.) यांच्याकडून मालमत्तेच्या कागदपत्रांची जमवाजमव करणे अशक्य आहे. इतकेच नव्हे तर आपल्याला याप्रकरणी वकिलांचा सल्लाही घ्यायचा असल्याने 15 दिवसांचा अवधी वाढवून मिळावा, अशी मागणी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली असल्याचे आमदार साळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मी चौकशीला सामोरे जाणार आहे, हिंमत असेल तर मला शिंदे – फडणवीस सरकारने जेलमध्ये टाकून दाखवावे, असे आव्हानही आ. साळवी यांनी या वेळी दिले. स्व. बाळासाहेब ठाकरेंची पाठीवर पडलेली थाप हीच? आपली सर्वात मोठी मालमत्ता असल्याचेही ते म्हणाले.

आमदार साळवी यांना रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावून मालमत्तेच्या उघड चौकशीसाठी आवश्यक असणार्‍या जबाबासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. शनिवारी ही नोटीस देऊन सोमवारी सकाळी 11 वा. हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्यासह कुटुंबियांच्या उत्पन्न – खर्च व मालमत्तांच्या कागदपत्रांसह उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार राजन साळवी यांनी भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत असलेल्या सरकारवर जोरदार हल्ला केला. मी स्वच्छ आणि निर्दोष असून या चौकशीला हजर राहणार आहे.? ? हिंमत असेल तर मला जेलमध्ये टाकून दाखवावे. काहीही झाले तरी पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचे सांगून आ. राजन साळवी यांनी चौकशीची ही प्रक्रियाच बेकायदेशीर असल्याचे या वेळी सांगितले.

राज्य सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही नोटीस दिल्यानंतर माझ्याकडे काय घबाड आहे हा प्रश्न पडला आहे. भाजपची सरकारे जेथे जेथे आहेत तेथे विरोधकांना अशा नोटीस देण्याचे काम होते. परंतु जे कोणी बेहीशोबी मालमत्तावाले भाजपमध्ये प्रवेश करतील ते स्वच्छ होत आहेत. आम्ही अनेक वेळेला सामाजिक हितासाठी तुरुंगात गेलो आहोत. म्हणून अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसैनिक माझ्या पाठीशी आहेत. उलट अशा चौकशीमुळे मी आणखी मोठा झालोय, असे सांगून आमदार साळवी यांनी स्व. बाळासाहेबांनी जिल्हाप्रमुख असताना पाठीवर मारलेली थाप हीच माझी सर्वात मोठी संपत्ती असल्याचे सांगितले.

रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी नोटीस देऊन सोमवारी हजर राहण्यास सांगितले आहे. परंतु, आवश्यक असणारी कागदपत्रे रविवारच्या एका दिवसात मिळू शकत नाहीत. त्याचबरोबर या प्रकरणी वकिलांचाही सल्ला घ्यायचा आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 15 दिवसांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली असल्याचे आ. राजन साळवी यांनी या वेळी सांगितले. रविवारी आठवडा बाजार येथील पक्षकार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी त्यांच्यासोबत स्थानिक नेते संजय साळवी, बावा चव्हाण, संजय शिंदे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here