
वेगुर्ले; पुढारी वृत्तसेवा : वेंगुर्ले तालुक्यातील तुळस खरीवाडी येथे गेल्या आठवड्यात ३ शेतकऱ्यांच्या जनावरांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे. याबाबत पशु विभागाने त्वरित या भागात लक्ष पुरवावे, अशी मागणी शेतकऱ्यातून करण्यात आली आहे.
काल (सोमवार) शेतकरी सखाराम राघोबा आंगचेकर यांच्या गाभण म्हैशीचा गोठ्यातच मृत्यू झाला. तर गेल्या ८ दिवसांत याच वाडीतील बापू गणेश नाईक यांची म्हैस व हर्षवर्धन नाईक यांची गायीचा अज्ञात आजाराने मृत्यू झाला. येथील भागात शेतकऱ्यांची सुमारे ६० जनावरे असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान वेंगुर्ले तालुक्यातही लम्पीसदृश्य आजार फैलावत असून, आपल्या परिसरात लम्पी प्रतिबंधक लसीकरणच झाले नाही, अशी माहिती शामसुंदर राय यांनी दिली. त्यामुळे संबंधित विभागास याचे गांभीर्यच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वसामान्य व गोरगरीब शेतकरी आपल्या जनावरांचे मोठ्या कष्टाने जतन करतो. परंतु अचानक जनावरे दगावल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. लम्पीसदृश्य व्यतिरिक्त अन्य कोणत्या आजाराने जनावरे दगावली असतील, तर त्वरित या कार्यक्षेत्रात पाहणी करुन त्याबाबत निदान करुन त्या आजारावर लसीकरण करावे. पशु विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तुळस येथील शेतकरी संघटक शामसुंदर राय यांनी केली आहे.
हेही वाचा :