मसुरे; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या व लाखो भाविकांच्या नवसास पावणार्‍या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची यात्रा (Anganewadi Bharadi Devi Yatra) शनिवारी, दि. 4 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. दोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर यावर्षी ही यात्रा निर्बंधमुक्त होत असल्याने यावेळी यात्रोत्सवाला किमान दहा लाखांपेक्षा जास्त भाविक परिस्थिती दर्शवतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी यात्रोत्सवाला महाराष्ट्रासह देशभरातील भाविक उपस्थिती दर्शवितात. या यात्रोत्सवाचा दिवस अथवा तिथी निश्चित नसते. ग्रामस्थांनी धार्मिक विधी पार पाडून देवीने दिलेल्या कौलाप्रमाणे या यात्रेची तारीख जाहीर केली जाते. यामुळे श्री भराडी देवीच्या देशभरातील भाविकांना या यात्रोत्सवाच्या मुहूर्ताची आतुरता असते. सर्व सामान्य भाविकांबरोबरच राज्यातील अनेक मंत्री, अधिकारी, चित्रपटसृष्टीतील सेलिब्रेटी या यात्रोत्सवास आवर्जुन उपस्थिती लावतात. देशभरातील भाविकांप्रमाणेच देशभरातील विविध प्रकारचे व्यापारी या यात्रोत्सवास व्यावसायासाठी दाखल होतात. यामुळे तीन दिवसांच्या या यात्रोत्सवात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यात्रोत्सवासाठी जिल्ह्यातील सर्वच एसटी आगारातून तसेच पंचक्रोशीतील गावांमधून आंगणेवाडीसाठी जादा एसटी गाड्या सोडलया जातात. तसेच देशभरातून येणार्‍या भाविकांसाठी मुंबई व पुणे येथून कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे गाड्या सोडल्या जातात.

ही यात्रा 4 फेब्रुवारी 2023 रोजी होणार असल्याचे आज येथील मानकरी आंगणे कुटुंबीयांनी जाहीर केले. यामुळे प्रशासकीय पातळीवर या यात्रेचे नियोजन सुरू होणार आहे. त्या बरोबर भविकांना केंद्रबिंदु मानुन कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता भाविकांना भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडीचे सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मुंबई मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी दिली. (Anganewadi Bharadi Devi Yatra)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here