अलिबाग / मुरुड; पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरावर घोंगावणारे मदौस चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रविवारी सकाळपासून हवामानात बदल जाणवला नसला तरी अरबी समुद्रात वादळाची दहशत कायम असून मच्छीमारी बोटींना अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, येत्या चार दिवसांत कोकण किनारपट्टीवर पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने कोकणातील सुमारे दीड लाख हापूस आंबा बागायतदार देखील सद्य:स्थितीत धास्तावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ताी निवारण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यात एकुण 4 हजार मच्छीमार बोटी आहेत. त्यातील बहुतांश बोटी मच्छीमारीसाठी जवळच्या म्हणजे किनार्‍यापासून 15 ते 20 वाव अंतरावर समुद्रात गेल्या आहेत. या सर्व बोटीवर वायरलेस, मोबाईल, रेडिओ, जीपीएस सिस्टिम या आधुनिक यंत्रणा असल्याने बदलत्या हवामानाचा इशारा त्यांना सत्वर मिळत असतो. वातावरणातील बदल जाणवल्यास त्या बोटी किनार्‍याकडे सत्वर पोहोचू शकतात, अशी माहिती रायगडचे सहायक मत्स्य आयुक्त संजय पाटील यांनी दिली आहे. मदौस चक्रीवादळ अरबी समुद्रात घोंघावत असून त्याची दहशत मच्छीमारांमध्ये दिसून येत आहे. चक्रीवादळ देण्यात आला असला तरी त्यापूर्वीच म्हणजे गुरुवार व शुक्रवारी मुरूड, एकदरा, राजपुरी, नांदगाव या समुद्रकिनारपट्टीवरील 200 नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here