रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्हावासीयांचं अंतराळ पाहण्याचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. राज्यातील पहिल्या अ‍ॅक्टिव्ह थ्रीडी तारांगणाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी शुभारंभ होत आहे. राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीकरांचे तारांगणाचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. चंद्राचा पृष्ठभाग जवळून कसा दिसतो याच्यासह अंतराळातील ग्रह, तारे, लघुग्रह, आकाशगंगा यांचे दर्शन होणार आहे. आकाशातील लघुग्रहाच्या स्फोटाचा अनुभवही घेता येणार आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. या नवीन स्टेट ऑफ द आर्ट, अ‍ॅक्टिव्ह स्टिरीओ 3 डी तारांगणामध्ये, खगोलीय वस्तूंचे प्रत्यक्ष अनुभव देणारे आणि तारामंडळातील अद्भूत आश्चर्याने मंत्रमुग्ध करणारे 3 डी शो दाखवले जाणार आहेत. भारत सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणातील मार्गदर्शक तत्वांना अनुसरून रत्नागिरी नगरपरिषदेने तारांगण (प्लॅनेटेरियम) आणि विज्ञान भवन (सायन्स पार्क) विकसित करण्यासाठी उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या तारांगणातील आधुनिक उपकरणे ही अमेरिकेतून मागवण्यात आली असून मुंबईच्या इन्फोव्हिजन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडद्वारे कार्यान्वितही केली जात आहेत.

रत्नागिरीचे आमदार, पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या वै़ज्ञानिक गुणांना वाव देण्यासाठी अत्याधुनिक तारांगण उभारण्याचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवले आहे. राज्यातील हे पहिलेच थ्रीडी व देशातील थ्रीडीमधील पाचवे तारांगण आहे. रत्नागिरीचे हे अ‍ॅक्टिव्ह 3 डी तारांगण म्हणजे डिजिस्टार 7 ची 2 डी आणि अ‍ॅक्टिव्ह 3 डी प्लेबॅक सॉफ्टवेअरने सुसज्ज अशी खगोलशास्त्रीय प्रतिकृती आहे. डिजिस्टारचे रिअलटाइम गरामिक इंजिन प्रगत भौतिकशास्त्रावर आधारित प्रस्तुतीकरण प्रणालीमुळे ग्रहांच्या पृष्ठभागावरील अत्यंत सूक्ष्म तपशील प्रस्तुत करण्यास सक्षम आहे. डिजिस्टारचे हे सॉफ्टवेअर अमेरिकेच्या ‘नासा’च्या डिजिटल युनिव्हर्समधील डेटा बेसच्या आधारे विकसित केलेले आहे.

तारांगणातील शो हे मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये असतील. तसेच प्रत्येक खेळ 30 ते 35 मिनिटांचा असेल. या तारांगणाची आसन क्षमता 65 आहे. तारांगणामुळे रत्नागिरीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, ना. सामंत यांनी रत्नागिरीला शैक्षणिक हब बनवण्याच्या दिशेनेही टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here