कणकवली; पुढारी वृत्तसेवा :  माझ्या विचारांचा सरपंच बसला, तरच विकास होईल. जर माझ्या विचारांचा सरपंच बसला नाही तर एक रुपयाचा निधीही मिळणार नाही. मग याला धमकी समजा किंवा अन्य काही. पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे मला विचारल्याशिवाय निधी देणार नाहीत हे लक्षात ठेवा, असे वक्तव्य आ. नितेश राणे यांनी नांदगाव ” येथे भाजप पुरस्कृत ग्रामपंचायत उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना केले.

याबाबत ठाकरे शिवसेनेचे नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर यांनी आ. नितेश राणे यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी व पोलिसांकडे केली आहे.

नांदगाव तिठा येथे प्रचारसभेत भाषण करतेवेळी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी माझ्या अधिकाराखाली आहेत. त्यामुळे आम्हाला मतदान केले नाही तर सरकारचा एक रुपयाचाही निधी नांदगाव गावासाठी दिला जाणार नाही, अशी धमकी मतदारांना दिली आहे. त्याची व्हिडीओ क्लिपदेखील व्हायरल होत आहेत. आ. नितेश राणे यांच्या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप आपणास सादर करत आहोत. तरी यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा नांदगाव ग्रामस्थांच्या समवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजा म्हसकर यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here