राजापूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असतानाच हातिवले येथील टोल सेवा सुरू करण्यात आल्याने वाहन चालक आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर आज (दि.२१) आंदोलन केले. जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल वसुली सुरू करु नये, अशा विविध मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या. या आंदोलनामुळे हातिवले परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे उद्यापर्यंत (दि.२२) टोलवसूली स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, भाजप नेते निलेश राणे गुरुवारी (दि.२२) कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले येथील टोलसेवा अचानक सुरु करण्यात आली. यापूर्वी देखील ती सुरु करण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र, प्रखर विरोधामुळे तो सफल झाला नव्हता. त्यावेळी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्वपक्षीयांसह वाहन चालकांनी मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील हातिवले येथे टोलवसुली करण्यास विरोध केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून टोलवसुली सुरू झालेली नव्हती. मात्र, ठेकेदारांकडून आजपासून टोलवसुली सुरूवात करण्यात आली. त्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांसह वाहनचालकांनी पुन्हा एकदा टोलवसुली विरोधात आक्रमक पवित्रा घेत विविध मागण्यांची जोपर्यंत पूर्तता होत नाही, तोपर्यंत टोलवसुली करण्यास विरोध केला.

दरम्यान, निलेश राणे यांनी भ्रमणध्वनीद्वारे टोलवसुली करणार्‍या ठेकेदारासह लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी टोलवसुलीला आक्रमकपणे विरोध करताना उद्या (दि.२२) पर्यंत टोलवसुली न करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे टोलवसुली तात्काळ थांबविण्यात आली असून, उद्या (ता . ऱाजापूर ) सकाळी राणे हे राजापूर येथील ठेकेदारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर टोलवसुली संबंधित पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचलंत का?

The post रत्नागिरी : सर्वपक्षीयांच्या आंदोलनानंतर टोलवसुलीला स्थगिती appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here