रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या ड्रोनच्या सहाय्याने शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी ड्रोन सबसिडी योजनेंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतच्या ड्रोनच्या खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत अनुदान योजना जाहीर केली आहे. या योजनेत ड्रोनच्या प्रशिक्षणासाठी केंद्रेही सुरू करण्यास मान्यात देण्यात आली असून, या केंद्राद्वारे शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कोकणासाठी या योजनेत एक केंद्र मंजूर झाले असून, रत्नागिरी जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना या केंद्रात ऑनलाइन नोंदणी करून ड्रोन प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. यासाठी संकेतस्थळे देण्यात आली आहेत. केवळ पाऊस, पूर, दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिके नष्ट होत नाहीत. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची पिके कीड आणि रोगामुळे नष्ट होतात. ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने त्याच पिकांवर खूण केली जाणार आहे. याच्या मदतीने, मल्टिस्पेक्ट्रल प्रतिमा तयार करून पिकाची वेळेवर बचत करण्यास मदत होते. या सर्वाशिवाय पीक नुकसान तपासण्यासाठी ड्रोनची मदत होते. मल्टिस्पेक्ट्रल सेन्सर आणि आरजीबी सेन्सरच्या मदतीने शेतीच्या नुकसानीची अचूक माहिती गोळा करता येते.

कृषी ड्रोन तण, संक्रमण आणि कीटकांमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांची माहिती गोळा करू शकतात. याच्या मदतीने शेतकरी आपली पिके नुकसान होण्यापासून रसायनांचा वापर करून वाचवू शकतात. शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके फवारणीसाठी अनेक दिवस लागतात. ड्रोनच्या मदतीने काही तासांत ते पूर्ण करता येणार आहे. उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या सेन्सर्समुळे ड्रोन कुठे पोषक तत्त्वांची कमतरता आहे हे देखील ओळखतो. त्या ठिकाणी खताची अधिक प्रमाणात फवारणी करता येते. त्याचबरोबर कीटकनाशकांची योग्य माहिती मिळाल्यानंतरही ड्रोनने योग्य ठिकाणी फवारणी करण्यात येते. टाईम लॅप्स फोटोग्राफीच्या मदतीने त्या ठिकाणी पाण्याचे सिंचन योग्य प्रकारे केले जाते. पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी माती तपासण्याचे कामही ड्रोनद्वारे होणार आहे. यासाठी कोकणात एक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून, दापोली कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत हे केंद्र रत्नागिरी किंवा सावंतवाडी येथील विद्यापिठाच्या उपशाखेत उभारण्यात येणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here