
लांजा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील देवधे फाटा येथील रोहित इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला सोमवारी पहाटे भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागल्याने या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. मात्र दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील देवधे फाटा येथील रोहित रवींद्र कांबळे यांच्या रोहित इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाला आग लागल्याचे सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. याबाबत ग्रामस्थांनी रोहीत कांबळे व त्यांच्या कुटुंबाशी तातडीने संपर्क करून त्यांना घटनेबाबत कळविले. या घटनेत दुकानाला लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते. त्या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांकडून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. यावेळी दुकानात असलेले सर्व सामान पूर्णपणे जळून खाक झाले असून सुमारे 7 लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी प्राथमिक अंदाजात सांगितले. या संदर्भात अधिक तपास लांजा पोलिस करत आहेत.