
विजयदुर्ग, पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजयदुर्ग किल्ल्यावर आंदोलन केले. यावेळी विजयदुर्ग किल्ल्यावरून अजित पवार यांचा प्रतीकात्मक पुतळा कडेलोट करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.
अखेर विजयदुर्ग जेटी येथे अजित पवार व आ.जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळयाला खाडीच्या पाण्यात टाकून निषेध करण्यात आला.
यापुढे अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यास त्यांना कुठेही फिरू देणार नाही, असा इशारा आ. राणे यांनी दिला.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विजयदुर्ग किल्ला येथे पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळी यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले होते.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आ. राणे यांच्या नेतृत्वाखाली पुतळा कडेलोट व निषेध आंदोलन करण्यात आले. किल्ल्यातून पुतळा कडेलोट आंदोलन करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. मात्र, आ.राणे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी किल्ल्यामध्ये प्रवेश करीत छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष करीत व अजित पवार यांचा विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.