रामपूर : पुढारी वृत्तसेवा : कोकण विभाग शिक्षक मतदार संघ विधान परिषद निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत १३ जानेवारी, अर्जाची छाननी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख १६ जानेवारी असून ३० जानेवारीला मतदान होणार आहे. २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कंबर कसली असून निवडणुकीसाठी रणसिंग फुंकले आहे.

कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांची मुदत ७ फेब्रुवारीला पूर्ण होत आहे. बाळाराम पाटील पुन्हा विधान परिषद शिक्षक मतदार संघ निवडणूक लढवीत असून त्यांना महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, शेकापचा पाठिंबा आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असून मतदार मोजणी कमी झाली आहे. पालघर जिल्ह्यात ९०००, ठाणे १५,७३६, रायगड १००००, रत्नागिरी ४३२८, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४५६ मतदार नोंदणी झाली असून एकूण ४१ हजार ५२० मतदार मतदान करणार आहेत.

ज्ञानेश्वर म्हात्रे यांना शिंदे, शिवसेना-भाजपचा पाठिंबा असल्याचे वक्तव्य करीत आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू निवडणूक लढविणार आहेत. शिक्षक भरतीचे रत्नागिरी जिल्ह्यातील धनाजी पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. आमदार बाळाराम पाटील यांनी नुकताच मतदार संघात एक दौरा पूर्ण केला असून कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. गेल्या सहा वर्षांत ५० लक्षवेधी विधान परिषदेत मांडल्या. वैयक्तिक – स्वरूपात शिक्षकांच्या समस्या सोडविल्या आहेत. दरम्यान, गेल्या सहा वर्षांत शिक्षक भरती झाली नसल्यामुळे मतदारांची संख्या घटली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here