
खेड ; पुढारी वृत्तसेवा : काल (मंगळवार) रात्री १२ वाजल्यापासून खेडमधील ४०० कर्मचाऱ्यांसह राज्यातील ८६ हजार वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी व ४२ हजार कंत्राटी कामगारांनी ७२ तासांचा संप सुरू केला आहे. आज (बुधवार) खेड येथील महावितरणच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन घोषणा दिल्या. यावेळी संप यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करत जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन वीज कर्मचाऱ्यांनी केले.
वीज उद्योगातील कर्मचारी संघटनांच्या संघर्ष समितीने दि.३ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे. त्यामध्ये खेडमधील ४०० वीज कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले आहेत. सुमारे ३५ अभियंते, २० अधिकारी व ३४५ हून अधिक नियमित व कंत्राटी कर्मचारी संपात सहभागी झाल्याने खेडमध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला आहे.
या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीच्या सदस्यांनी खेड वीज कार्यालयाच्या गेट समोर बैठक घेऊन संप यशस्वी करण्याचा निर्धार केला. राज्यातील जनतेचे व सरकारचे लक्ष वेधण्याकरीता नागपूर विधानसभेवर ३५ हजार वीज कामगारांनी विराट मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ हजार कामगारांनी मोर्चा काढून राज्याचे मुख्यमंत्र्यांच्याच भागात अदानी खासगी या भांडवलदाराने समांतर वीज वितरणाचा परवाना मागितल्यामुळे त्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शासन व व्यवस्थापनाकडून संघर्ष समितीला चर्चेला बोलवून खासगीकरणाचे धोरण आम्ही मागे घेतो असे स्पष्ट आश्वासन देणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेले नाही. ऊर्जा सचिव आणि काल घेतलेल्या बैठकीमध्ये ठोस असे कुठलेही आश्वासन दिलेले नसल्यामुळे वीज कामगारांच्या संघर्ष समितीने ७२ तासांच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती यावेळी संपात सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिली.
हेही वाचा :