चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : चिपळुणात आलेल्या महापुरानंतर पूरमुक्त चिपळूणसाठी चिपळूण बचाव समिती निर्माण झाली. गेल्यावर्षी समितीच्या आंदोलनामुळे आणि नागरिकांच्या उठावामुळे शासनाला दखल घ्यावी लागली. परिणामी, वाशिष्ठी व शिव नदीतील गाळ काहीअंशी काढला गेला. मात्र, यावर्षी बचाव समितीमध्ये फूट पडली असून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या वर्षात समितीने गाळ काढण्याचा एकदाही आढावा घेतलेला नाही. असे असले तरी गेले सहा महिने वाशिष्ठीतील गाळ काढण्याचे काम अहोरात्र सुरू होते. याची आरोप करणार्‍यांना कसलीच कल्पनाही नव्हती, असे समोर येत आहे. मात्र, आता याच बचाव समितीतील सदस्य आपापसात आरोप-प्रत्यारोपात ‘मश्गुल’ झाले आहेत.

गतवर्षी काढलेला गाळ काढायचा कुठे? हा प्रश्न निर्माण झाला होता. शहरातील ठिकठिकाणच्या भागात वाशिष्ठी, शिव नदीतील गाळ काढून टाकण्यात आला. आता गाळ टाकायचा कुठे हा प्रश्न निर्माण झाला. यानंतर लोकांना गाळ मोफत घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले. तरीही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर यावर्षी शासनाचे स्वामित्व धन भरून (रॉयल्टी) चौपदरीकरण करणार्‍या कंपनीने वाशिष्ठी नदीपात्रातील गाळ काढावा म्हणून संबंधित ठेकेदार कंपनीला मंजुरी देण्यात आली आणि ऑगस्टपासून वाशिष्ठीतील गाळ काढण्याचे काम सुरू झाले. खडपोली ते पिंपळी येथील कोयनेचा कॅनॉल दरम्यान असणार्‍या दीड किलोमीटरचा गाळ काढण्यात आला असून याची पाहणी बचाव समितीच्या एकाही सदस्याने केलेली नाही किंवा या वर्षभरात पावसाळ्यानंतर गाळ काढण्याबाबत नियोजन अथवा रूपरेषा ठरविलेली नाही. गेले सहा महिने वाशिष्ठी पात्रातील गाळ काढण्याचे काम सुरू असून त्याकडे मात्र समितीने पाठ फिरविल्याचे समोर येत आहे. हे काम कशा पद्धतीने सुरू आहे? गाळ कुठे टाकला जात आहे? शहरवासीयांना देखील याची कल्पना नसताना तब्बल दीड कि.मी.चा टप्पा पूर्ण झाला आहे. खडपोलीपासून पिंपळी कॅनॉलच्या तोंडापर्यंत गाळ काढण्याचे काम झाले असून हा गाळ मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वापरला जाणार आहे.

बचाव समितीमधील अनेकजण आपण त्या समितीत नाही. आपण बाहेर पडलो आहोत, असे सांगत आहेत. मात्र, त्यांनाही या कामाची कोणतीच कल्पना नाही. हेच सदस्य या वर्षी आपापसातील मतभेद चव्हाट्यावर आणत आहेत. उर्वरित टप्प्यातील गाळ काढण्याच्या कामाचे देणेघेणे नाही का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. चिपळूण बचाव समितीमध्ये दहा ते बारा सदस्य होते. नागरिकांनी या समितीला पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला आणि शहरामध्ये उठाव झाला. परिणामी, शासनाला त्याची दखल घ्यावी लागली, हे चिपळूण समिती सपशेल विसरली आहे आणि त्यांच्यातील सदस्यांमध्ये आता श्रेयवाद रंगला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here