
रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : शहरात पावणेतीन वर्षांपूर्वी मोबाईल शॉपी मालकावर खंडणीसाठी गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणातील तीन संशयितांपैकी त्यांचा म्होरक्या आणि सराईत गुन्हेगार सचिन भिमराव जुमनाळकर ( वय 42, रा. बेलबाग, रत्नागिरी) न्यायालयीन कोठडीत आहे. तर त्याच्या दोन साथीदारांपैकी एक फरार असून एकाविरोधात न्यायालयाने वॉरंट काढले आहे.
सिध्दराव नामदेव कांबळे (वय 28, रा. बेलबाग, रत्नागिरी) हा फरार आहे. तर मनोहर हनुमंत चालवादी (वय 42, रा. रत्नागिरी) याच्याविरोधात न्यायालयाने वॉरंट काढले आहे. याबाबत नॅशनल मोबाईल शॉपीचे मालक मनोहर सखाराम ढेकणे (वय 60, रा. फडके उद्याननजीक, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यानुसार, 21 फेब्रुववारी 2020 रोजी रात्री 9.30 वाजता ते आठवडा बाजार येथील आपली शॉपी बंद करुन घरी जात होते. तेव्हा या तिन्ही संशयितांनी त्यांना अडवून 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. ढेकणे यांनी नकार देताच सचिनने आपल्याकडील पिस्तुलमधून त्यांच्यावर गोळी झाडली होती. यात ढेकणे गंभीर जखमी झाले होते.
याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. हा खटला सत्र न्यायालयात सुरु असून तीन संशयितांपैकी दोघे न्यायालयात हजर होत नसल्याने खटला चालवण्यात अडचणी येत आहेत.
हेही वाचलंत का ?