
रत्नागिरी: जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटनस्थळ असणाऱ्या गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थीनिमित्ताने हजारो भाविक येण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने यंत्रणेने जय्यत तयारी केली आहे. समुद्रकिनान्यावर कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठीही पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
नव्या इंग्रजी वर्षातील जानेवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात अंगारकीचा योग आला आहे. गणपतीपुळे येथे अंगारकीला पश्चिम महाराष्ट्रातून हजारो भाविक दाखल होत असतात. जिल्ह्यात पोलिस भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून महिलांची निवड चाचणी सोमवारी झाली. अंगारकीच्या निमित्ताने या महिला उमेदवारांसह त्यांचे पालक व नातेवाईकही रत्नागिरीत दाखल झाले असून, गणरायाचे दर्शन घेऊनच पुन्हा परतण्याची तयारीत आले आहेत. रविवारपासूनच अनेक पर्यटक जिल्ह्यात आले आहेत. सोमवारी देखील गणपतीपुळे येथे मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक आले होते.