खेड; पुढारी वृत्तसेवा : खेडच्या तीनबत्ती नाक्यात भगवा झेंडा व बाळासाहेबांचे बॅनर फडणाऱ्यांना उद्धव ठाकरे पक्षात घेऊन ते पक्षाची विचारधारा संपवत असल्याचे सिद्ध करत आहेत. माजी आमदार संजय कदम यांचा ठाकरे गटात प्रवेश म्हणजे त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल, अशी टीका दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी आज (दि.२१) माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली.

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी शुक्रवारी (दि. २०) आपला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश निश्चित असल्याचे जाहीर केले. तसेच  शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना आमदार कदम म्हणाले, संजय कदम यांनी खेडच्या तीनबत्ती नाक्यात भगवा झेंडा व बाळासाहेबांचे बॅनर फाडले होते. हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विसरले का? संजय कदम यांचा प्रवेश ही दोन वर्ष सुरू असलेली चर्चा आहे. या मतदार संघात माजी आमदारांचे मी आव्हान समजतच नाही. दापोली मतदारसंघातील शिवसैनिक सद्दैव बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत राहिला आहे. वंदनीय बाळासाहेबांचा लाडका मतदारसंघ हा दापोली मतदारसंघ आहे.

मुळात संजय कदम हे २०१३ मध्ये ज्या वेळी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले. त्यावेळी खेडच्या तीनबत्ती नाक्यावरील त्यांनी भगवा जाळला होता. त्यावेळेला वंदनीय बाळासाहेबांचे बॅनर त्यांनी जाळले होते; मग अशा व्यक्तीला ज्यावेळी उद्धव ठाकरे पक्षात घेण्यास तयार होतात म्हणजे राजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीच्या वरती सूड घेण्यासाठी कुठल्याही स्तरावर जायची तयारी ते दाखवतात, असं मला तरी वाटतं. संजय कदम सारखी व्यक्ती जेव्हा वारंवार पक्षांतर करते. त्या व्यक्तीची समाजातील विश्वासार्हता संपते. संजय कदम यांचा हा निर्णय राजकीय दृष्टिकोनातून हुशारीचा नसून ही त्यांची राजकीय आत्महत्या आहे. मी त्यांच्या प्रवेशाची वाटच बघतो आहे. त्यामुळे माझा पुढील वाटचालीचा मार्ग आणखी प्रशस्त होईल, असा विश्वासही आमदार कदम यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा : 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here