रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : भाजपने प्रत्येकवेळी गरजेपुरतेच छोट्या पक्षांना जवळ घेतले. त्यानंतर त्यांचे हाल काय झाले हे प्रत्येकाला माहीत आहे. त्यामुळे सध्या भाजपसोबत असणार्‍या शिंदे गटाचे काय होईल, याचे उत्तर येणार काळच देईल असे सांगत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते आ. भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला चिमटा काढला. तसेच छोट्या पक्षांना संपवायचे असा एककलमी कार्यक्रम भाजपकडून चालवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना आ. जाधव म्हणाले की, भाजपकडून बलाढ्य शिवसेनेला संपवण्यासाठी प्रयत्न केले गेले; परंतु हा पक्ष संपणारा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक छोट्या नवीन पक्षांना भाजपने जवळ केले. त्यात महादेव जानकार, सदाभाऊ खोत, विनायक मेटे यांची उदाहरणे देता येतील. या छोट्या पक्षांना जवळ घेतले, ते पक्ष किती वाढले. गरजे पुरताच त्याचा वापर केला जातो. आता शिंदे गटातील किती आमदार भाजपमध्ये जातात हे आताच सांगता येणार नाही. परंतु छोट्या पक्षाची उदहारणे पाहता शिंदे गटाच्या भविष्याचे उत्तर काळच देईल.

निवडणुक आयोगामध्ये सुरु असलेल्या सुनावणीबाबत आ. जाधव म्हणाले, लोकशाही वाचवायची असेल तर शिंदे गटातील सर्व आ. तत्काळ निलंबित केले पाहिजे. पक्षांतर्गत बंदी विरोधी कायद्याला गट करणे मान्यच नाही. त्यामुळे पक्षातून बाहेर गेले त्यांना दोनच पर्याय असतात. त्यांचे ताबडतोड निलंबन किंवा दुसर्‍या पक्षात जाणे हा होय. शिवसेनेतील पक्षांतर्गत निवडणुक घेणे हा अधिकार निवडणुक आयोगाचा आहे. विधान परिषदेच्या बारा आमदारांची मुदत संपली तरीही त्यावर निर्णय झालेला नाही. पक्षप्रमुखांची मुदत संपल्याची बाब आयोगाच्या लक्षात आणून दिली. त्यानुसार मुळ पक्षप्रमुखांना मुदत वाढ किंवा पक्षप्रमुख निवडण्याचा पक्षाला अधिकार देणे हे आयोगाचे काम असल्याचे त्यांनी सांगितले.

रामदास कदम यांच्या अती बोलण्यामुळे मी ठरवलं आहे की, दापोली-खेडमधील पुढचा आमदार हा उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचा निवडून आणणार. त्याची जबाबदारी घेतली आहे.तेथेही गोळाबेरीज केली आहे. माजी आ. संजय कदम यांचा प्रवेश हा त्याचाच एक भाग असून, यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास यशापयशाची चिंता न करता रत्नागिरीतही निवडणूक लढविण्यास आपण तयार आहोत.
– भास्कर जाधव, आमदार व नेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here