मालवण : पुढारी वृत्तसेवा – मालवण शहरातील बोर्डिंग ग्राउंडनजीक असलेल्या शिलाई मशीन दुरूस्ती व लेडीज टेलर या दोन दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली. यात १२ ते १३ शिलाई मशीन व ग्राहकांचे कपडे फॅन व इतर साहित्य जळून खाक झाले. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली.

मालवण बोर्डिंग ग्राउंड नजीक विलास परुळेकर यांचे शिलाई मशीन दुरूस्तीचे तर मेढा येथील मृणाल मोंडकर यांचे लेडीज टेलरचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी ५ वाजण्याच्या दुकानातून अचानक आगीचे लोळ येत असताना धुरीवाडा येथील भाई खोबरेकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ दुकान मालक विलास परुळेकर व मृणाल मोंडकर व आजूबाजूच्या नागरिकांना बोलावले. नगरसेवक मंदार केणी सुदेश आचरेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन बंब मागविला. मात्र दुकानात कपडे व इतर साहित्य असल्याने आगीने भडका घेतला. धुरीवाडा येथील राजू बिडये महेश सारंग आदी नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे प्रसंग टळला अन्यथा याठिकाणी असलेल्या अन्य दुकानांचे नुकसान झाले असते. शॉर्टसर्किटने आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लग्नाच्या साड्या आणि इतर साहित्याचे नुकसान

धुरीवाडा येथील लागलेल्या आगीत विलास परुळेकर यांचे १२ ते १३ शिलाई मशीन तर मृणाल मोंडकर यांच्या दुकानातील ग्राहकांच्या फॉल बिडिंगसाठी आलेल्या साड्या व किंमती सामान जळून पूर्ण खाक झाले. कोरोना कालावधीनंतर मृणाल मोंडकर यांनी कर्ज काढून आपले नव्याने लेडीज टेलरचे दुकान थाटले होते. मात्र आता या आगीत पूर्ण दुकानचं बेचिराख झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दुकान पूर्ण बेचीराख झाल्याने मृणाल यांना अश्रू अनावर झाले होते.

सकाळी नुकसानग्रस्त सौ मोंडकर यांना माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावंकर यांनी आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला. तर विलास परुळेकर यांना माजी नगरसेवक मंदार केणी यांनी आर्थिक मदतीचा हात दिला. नायब तहसिलदार गंगाराम कोकरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here