कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख आ. वैभव नाईक यांच्या मालमत्तेची एसीबीकडून चौकशी सुरू असतानाच आता त्यांच्या कुडाळ मतदारसंघातील काही ग्रामपंचायतींनाही एसीबी विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सोमवारी 30 जानेवारीला संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंचांना आ. नाईक यांच्या फंडातून झालेल्या कामांच्या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, अशा आशयाची नोटीस एसीबी रत्नागिरी विभागाने बजावली आहे. ग्रामपंचायतींच्या सरपंचांना एसीबीने अशाप्रकारची नोटीस बजावण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच वेळ आहे.

शिवसेनेचे आ. वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीमार्फत मालमत्तेसंदर्भात काही दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर या विभागाकडून त्यांची चौकशी सुरू असतानाच या चौकशीला आपण भीक घालत नसल्याचे सांगत चौकशीला सहकार्य करण्याची भूमिका आ.वैभव नाईक यांनी जाहीर केली होती. अलिकडेच त्यांच्या मालमत्तेसंदर्भात एसीबी विभागाकडून मोजमापे घेण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या मतदारसंघातील काही ग्रामपंचायतींना थेट रत्नागिरी एसीबी विभागाकडून नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. आ.वैभव नाईक यांच्या फंडातून झालेल्या कामांबाबत चौकशी करून जबाब नोंदविण्यात येणार आहेत. संबंधित कामांच्या सर्व कागदपत्रे, बॅक खाते व अन्य आवश्यक कागदपत्रांसह 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय रत्नागिरी येथे उपस्थित राहावे असे संबधित ग्रामपंचायतींच्या सरपंचांना बजावण्यात आलेल्या नोटीसीत एसीबी विभागाचे उप अधीक्षक यांनी नमूद केले आहे. या प्रकाराने आ.वैभव नाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे बोलले जात असून आमदारांनंतर आता थेट सरपंचांना एसीबी विभागाकडून चौकशीसाठी नोटीसा पाठवल्याने खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here