रत्नागिरी

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : यावर्षी गतवर्षीपेक्षा सरासरी जास्त पाऊस पडला आहे. मात्र, पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही तर एप्रिल ते मे महिन्यात पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे. यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनातर्फे प्रभावी उपाययोजना सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत आतापर्यंत 2 हजार 327 बंधारे बांधण्यात आले असून, यामध्ये 70 कोटी लिटर पाणी साचले आहे.

दरवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतोच पडतो. असे असले तरी दरवर्षी जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवतेच. याला जिल्ह्याची भौगोलिक परिस्थितीही तेवढीच कारणीभूत आहे. प्रत्येक वर्षी शासनातर्फे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात. गावातून वाहणारे नाले, वहाळ आणि उपनद्या यावर तात्पुरते बंधारे बांधून त्या पाण्याचा उपयोग करण्यात येत आहे. श्रमदानातून हे बंधारे उभारले जात आहेत. सात वर्षांपुर्वी ही मोहीम सुरु करण्यात आली होती. पहिल्या वर्षी दहा हजार बंधार्‍यांचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी पन्नास टक्केहून अधिक बंधारे उभारण्यात यश आले.

कोकण कृषी विद्यापिठाने तयार केलेल्या विजय बंधार्‍यांचे मॉडेल पाणी साठवून ठेवण्यासाठी अधिक उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. सिमेंटच्या पोत्यांचा उपयोग करून हे बंधारले उभारले जातात. यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत मोसमी पाऊस सुरू होता. त्यामुळे गावागावांतून वाहणारे नदी, नाल्यांचे प्रवाह वेगवान होते. परिणाम प्रत्यक्ष बंधारे बांधण्यासाठी उशिर झाला. फेब्रुवारी महिला आला तरीही अनेक ग्रामस्थ अजुनही श्रमदानातून बंधारे उभारत आहेत. प्रत्येक गावाला दहाचे लक्ष्य दिलेले होते; परंतु गावानिहाय प्रत्येकी तिन ते चार बंधारे उभारण्यात येत आहेत. काही वाड्या कमी लोकसंख्येच्या असल्याने तिथे श्रमदानासाठी लोकांचा प्रतिसाद मिळत नाहीत. बंधार्यातील पाण्याचा उपयोग सिंचनासाठी, कपडे धुणे, गायी-गुरांना करून दिला जातो. तसेच बंधारा बांधल्यानंतर अडलेले पाणी जमिनीत जिरते आणि किनार्‍यावरील विहिरींची पाणी पातळीही वाढण्यास मदत होते. एप्रिल, मे महिन्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात पाणी पातळी कमी होते. काही ठिकाणी विहीरी पूर्णतः कोरड्या पडतात. त्यावेळी पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. बंधार्यातील पाण्यामुळे अनेक विहिरींचे पाणी उशिरापर्यंत वापरण्यास मिळत आहे. काही गावांमध्ये कच्चे बंधारे विहिरींची पाणी पातळी वाढविण्याच्या उद्देशानेच उभारले जातात.

गेल्या दोन वर्षांत गावागावांत पाणी योजनांचे कामे हाती घेण्यात आलेली आहेत. त्यामुळे बंधारे उभारण्याकडील लोकांचा कल कमी होत आहे. रडतखडत दरवर्षीचे लक्ष्य साध्य होत आहे. अनेक ठिकाणी वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील लागवडीकडे दुर्लक्ष करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे फक्त सिंचनासाठी बंधारे बांधर्‍यांचा टक्का कमी झाला आहे. जिल्ह्यात 846 ग्रामपंचायतीत 2 हजार 327 बंधारे उभारले आहेत. त्यात वनराई 342, विजय 627 आणि कच्चे 1 हजार 361 बंधार्‍यांचा समावेश आहे. सर्वाधिक बंधारे हे दापोली तालुक्यात असून, सरासरी एका ग्रामपंचायतीत पाच बंधारे आहेत.

The post रत्नागिरी : बंधार्‍यांमध्ये 70 कोटी लिटरचा जलसंचय appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here