रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणातील बहुतांश जिल्ह्यात कमाल तापमानात 5 अंशाने वाढ झाली. सोमवारपासून पुन्हा तापमानात हळूहळू घट होऊन कमाल तापमान 28 ते 30 अंशांपर्यंत आणि किमान तापमान 18 ते 20 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रात गारवा कायम राहून मळभी वातावरण राहाणार असल्याने अशा संमिश्र वातावरणात कोकणातील जिल्ह्यात पुढील 4 ते 5 दिवस सौम्य थंडी जाणवण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. थंडीचा जोर ओसरू लागला असल्याने पुन्हा एकदा बागायतदरांमध्ये चलबिचल सुरू झाली असून, आंबा हंगामाचे वेळापत्रक पुन्हा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बंगालच्या उपसागरासह अरबी सागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हिवाळा आणि पावसाळा दोन्ही एकाच वेळी येणार असल्याने मिश्र वातावरणाची शक्यता उर्वरित महाराष्टारत राहणार आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम कोकण किनारपट्टी भगाात होणार आहे. त्याच प्रभावाने कोकणातील थंडी आता कमी होऊ लागली आहे.

गेल्या आठवढ्यात हुडहुडी भरायला लावणार्‍या थंडीने आता दिवसभऱात पडणार्‍या उन्हाने ताबा घेतला आहे. त्यामुळे वातावरणात ताप वाढू लागला असून गारठा गायब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मोहरासाठी आणि फळधारणेसाठी अनुकूल असलेल्या वातावरणात अकस्मात तापमान वाढल्याने फळधारणेच्या सक्रियतेत खंड पडून हंगाम लांबण्याच भीती आता आंबा पिक उत्पादक शेतकर्‍यांमध्ये आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही तापमान वाढीची धास्ती आता बागयतदारामध्ये लागून राहिली आहे. गारठा कमी झाल्याने त्याचा प्रभाव फळधारणेवर होण्याची भीती येथील बागायतदार संतोष घाडे आणि संजय पवार यांनी व्यक्त केली आहे. थंडीच्या प्रमाणात होणार्‍या बदलाचे परिणामावर संभाव्य उपाय सुचविण्याची मागणी आता बागायतदरांनी कृषी विभागाबरोबरच प्रशासनाकडे केली आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here