रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : राजापूर तालुक्यातील पांगरे गावमळावाडी येथील पायवाटेवरुन घरी जाणार्‍या तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न तरुणाने केला. ही घटना सव्वा तीन वर्षांपुर्वी घडली होती. याप्रकरणी आरोपीला दोषी ठरवत न्यायालयाने ७ वर्षे सश्रम कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी (दि. ३१) सुनावली. सुरेंद्र सुरेश बाईत (वय २२, रा. कोड्ये तर्फे सौंदळ मधलीवाडी, राजापूर) असे शिक्षा झालेल्या दोषी आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडितेने राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी त्यावेळी इयत्ता १२ वीमध्ये शिकत होती. २५ सप्टेंबर २०१९ रोजी कॉलेजमधून पावणे बाराच्या सुमारास घरी जात होती. ती पांगरे गावमळावाडी येथील पायवाटेने निघाली असताना त्याच ठिकाणी गुरे चरविण्यासाठी गेलेल्या सुरेंद्र बाईतने पीडितेला पाहिले. ती एकटीच असल्याची संधी साधत सुरेंद्रने तिचे दोन्ही हात धरुन पायवाटेजवळ असलेल्या जंगलमय भागात फरफटत नेले. त्याठिकाणी त्याने तिच्याशी जबरदस्ती केली. शिवाय आरडा-ओरडा केल्यास मारुन टाकेन अशी धमकी दिली. यानंतर तिला जखमी करत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी पीडितेने राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. राजापूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. एम. वालावलकर यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. प्रफुल्ल सावळी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी आरोपीला भादंवि कलम 376 सह 511 मध्ये 7 वर्ष सश्रम कारावास व 10 हजार दंड न भरल्यास 1 वर्ष साधी कैद, भादंवि कलम 354 मध्ये 2 वर्ष शिक्षा 5 हजार दंड तसेच भादंवी कलम 323 व 506 मध्ये 6-6 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड काँस्टेबल किरण सकपाळे यांनी काम पाहिले.

हेही वाचलंत का ? 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here