
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : पासपोर्ट नुतनीकरणाच्या ऑनलाईन अर्जातील तांत्रिक कारणे दूर करुन तो मंजूर करण्यासाठी 45 हजार रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता घेणार्या पासपोर्ट एजंटला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रेल्वेस्टेशन जवळील हॉटेमध्ये बुधवारी सकाळी 11.18 वा. रंगेहात पकडले. तसेच त्याचा साथिदार असलेला डाटा ऑपरेटरला मुंबईतून सायंकाळी ताब्यात घेण्यात आले आहे.
पासपोर्ट एजंट शेखर मुरलीधर नेवे (रा.माहिम,मुंबई) आणि डाटा ऑपरेटर प्रकाशकुमार झरी मंडल (रा.कालिना,मुंबई) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदाराने आपला पासपोर्ट नुतनीकरण करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. त्या अर्जात काही तांत्रिक कारणे असल्यामुळे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, बीकेसी बांद्रा, मुंबई येथे तो प्रलंबित होता. तो मंजूर करुन देण्यासाठी शेखर नेवेने तक्रारदारांकडे डाटा ऑपरेटर प्रकाशकुमार मंडलला देण्यासाठी 1 लाख 80 हजार रुपये आणि स्वतःसाठी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती डाटा ऑपरेटरसाठी 80 हजार आणि आपल्यासाठी 5 हजार अशी 85 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे.
दरम्यान, 85 हजारांपैकी पहिला हप्ता म्हणून 40 हजार मंडलचे आणि 5 हजार रुपये आपल्यासाठी अशी 45 हजार रुपयांची लाच रत्नागिरी रेल्वेस्टेशन जवळील एका हॉटेलमध्ये घेताना शेखर नेवेला रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यापथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. तसेच त्याचा साथिदार असलेला डाटा ऑपरेटला सायंकाळी मुंबईतून ताब्यात घेण्यात आले.
अधिक वाचा :