नवी मुंबई: पुढारी वृतसेवा : कोकण शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीत पहिल्यांदाच पहिल्याच फेरीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजय झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांचा पराभव झाला आहे. म्हात्रे यांना 23 हजारांहून अधिक मते मिळाली आहेत.

नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे मतमोजणी करण्यात आली. कोकण शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर होते. पहिल्या फेरीत त्यांना 60 टक्के तर शेकापचे बाळाराम पाटील यांना 40 टक्के मतदान मिळाले. तर या मतमोजणीत दोन हजार मते अवैध ठरली. पहिल्या फेरीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजयाचा मार्ग पहिल्या फेरीतच मोकळा झाला होता. त्यांनी पहिल्या फेरीत सहा हजार मतांची आघाडी घेत पहिल्या फेरीत एकूण 22 हजार पेक्षा अधिक मते पारड्यात पडली.

म्हात्रे यांना 23 संघटनांनी पाठिंबा दिला होता. दोन केंद्रीय मंत्री, चार खासदार आणि चार मंत्री आमदार त्यांच्यासाठी मैदानात उतरले होते. कोकणातील शिक्षकांनी दाखवलेला विश्वास आणि भाजप नेत्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे आपला विजय झाला. विजयाचे श्रेय हे कोकणातील शिक्षकांना जात असल्याचे नवनियुक्त आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले. शिक्षकांच्या पेन्शनसह इतर प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मी शिक्षक असल्याने मला त्याची जाणीव असल्याचे ते म्हणाले. तर शेकापचे बाळाराम पाटील यांनी निवडणुकीत झालेला पराभव मान्य करत शिक्षकांनी दिलेला कौल आपण खुलेपणाने स्विकारतो असे म्हटले आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here