Nashik Graduate Constituency Result 2023: पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नाशिकमधून सत्यजित तांबेचा (Satyajeet Tambe) विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत मतमोजणीच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून सत्यजित तांबे हे 20 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसकडून एबी फॉर्म न मिळाल्याने अपक्ष अर्ज दाखल केलेल्या सत्यजित यांना भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिला. तर आधी भाजपाकडून प्रतिसाद न मिळाल्याने अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या शुभांगी पाटील (Shubhagi Patil) यांना शिवसेनेबरोबर महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झालं होतं. मात्र विजय दृष्टीपथात असतानाच सत्यजित तांबेनी जवळच्या व्यक्तीच्या निधनामुळे आनंदोत्सव साजरा करणार नसल्याचं जाहीर केलं आहे.

तांबेंनी केलं ट्वीट

सत्यजित तांबेंनी ट्विटरवरुन केलेल्या एका पोस्टमधून ही घोषणा केली आहे. “आपण विजयाच्या अगदी जवळ आहोत. पण (मी) विजयोत्सव साजरा करणार नाही. माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही,” असं सत्यजित तांबेंनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी, “सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा,” असं आवाहनही समर्थकांना केलं आहे. त्याचप्रमाणे,  “मी 3 ते 7 फेब्रुवारीला संगमनेर येथे मी सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये, ही विनंती,” असंही सत्यजित यांनी पावणेनऊ वाजता केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

सकाळीच केलेलं ट्वीट

सत्यजित यांनी सकाळीच मानस पगारच्या निधनाबद्दलची पोस्ट केली होती. मानसबरोबरचा फोटो शेअर करत सत्यजित यांनी, “माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र, नाशिक जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे,” अशा शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

20 हजारांहून अधिक मतांची आघाडी

रात्री 9 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार तिसऱ्या फेरीमधील 84 हजार मतांची मोजणी झाल्यानंतर सत्यजित तांबेना एकूण 45 हजार 607 मतं मिळाली. तर शुभांगी पाटील यांना 24 हजार 927 मतांपर्यंत मजल मारता आली. या 84 हजार मतांपैकी 8 हजार 378 मतं अवैध ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here