
दापोली : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिसई वजरवाडी येथील विठोबा सखाराम घोले (वय ६५) हे दापोलीहून नवीन कपड्यावरच बैलाला गोठ्यात नेण्यासाठी गेले. मात्र, नेहमीच्या कपड्यांवर मालक न दिसल्याने बैल बुजवला व त्याने मालकावरच हल्ला केला. यात मालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. तशी नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
गुरुवारी विठोबा घोले दापोलीत आले होते. दापोलीतून पिसईला गेल्यावर त्यांचा बैल पऱ्याकडे असल्याचा त्यांना फोन आल्याने ते घरी न जाता परस्पर बैलाला गोठ्यात नेण्यासाठी गेले. ते परतले नसल्याने कुटुंबियांनी रात्री शोधाशोध केली. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्याला, मानेला व छातीवर जखमा असल्याने बैलाने त्यांच्यावर जबर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मालक घोले यांनाच हा बैल दाद देत होता. इतर कोणालाही तो जवळ येऊ द्यायचा नाही. परंतु अचानक मालकावर हल्ला केल्याने मालकाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पक्षात पत्नी मुलगा-मुली नातवंडे असा परिवार आहे.
बैल विकला असता तर….
पिसई वजरवाडीत घोले यांच्या बैलाची मोठी दहशत असून, बैल दिसल्यास ग्रामस्थ भीतीपोटी पळून जातात. गावात कोणीही त्या बैलाच्या जवळ जात नाही. तसेच घरच्या कुटुंबातील व्यक्तीलासुद्धा यापूर्वी त्या बैलाने मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या बैलाला विकून टाकण्याचा सल्ला अनेकजण देत होते. मात्र, बैल चांगला आहे म्हणून त्यांनी या बैलाला घरीच ठेवले होते. जर बैल वेळीच विकला असता तर आज हा प्रसंग ओढावला नसता.