खेड : पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वे मार्गावर रविवार दि. १२ रोजी सकाळी १०.१७ वाजता खेड तालुक्यातील कळंबणी ते दिवाणखवटी या स्थानकादरम्यान नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या घटनेनंतर दुसरे इंजिन जोडून १२.३७ वाजता एक्स्प्रेस मार्गस्थ झाल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.

कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक रविवारी दि. १२ रोजी सकाळीच विस्कळीत झाली. सकाळी १०.१७ वाजता केरळ राज्यातील एर्नाकुलम ते नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन या स्थानकादरम्यान धावणारी (१२६१७) ही मंगला सुपरफास्ट एक्स्प्रेस इंजिनमध्ये बिघाड झाल्याने खेड तालुक्यातील दिवाणखवटी रेल्वे स्थानकाजवळ सुमारे दोन तास थांबली. यामुळे मुंबई सीएसएमटी ते मडगाव या दरम्यान धावणारी मांडवी एक्स्प्रेस व दिवा ते सावंतवाडी जाणारी सिंधुदुर्ग एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या करंजाडी स्थानकात रखडल्या.

मुंबईतून गावी व गावातून मुंबईत जाणाऱ्या दोन्ही बाजूकडील प्रवाशांची गर्दी सर्वच रेल्वे स्थानकांवर झाली होती. दुसरे इंजिन जोडून १२.३७ वाजता मंगला एक्स्प्रेस मार्गस्थ झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू झाली.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here