रत्नागिरी; भालचंद्र नाचणकर :  रत्नागिरी जिल्ह्यातील हिंदूंसह ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आदींसह इतर धर्मीय लोकसंख्या घटली आहे. त्याचवेळी मुस्लिम समाजाची लोकसंख्या मात्र वाढली आहे. मागील दोन जनगणनांच्या आकडेवारीतील तुलनेतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. हिंदू धर्माची लोकसंख्या ८३ हजार ९२६ ने कमी झाली आहे. त्यावेळी मुस्लिम समाजाची लोकसंख्या ११ हजार ५२५ ने वाढली आहे.

सन २००१ च्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात ६ लाख ५० हजार ६७७ हिंदू पुरुष आणि ७ लाख ४० हजार ४०७ महिला अशी १३ लाख ९१ हजार १३७ एकूण हिंदू जनसंख्या होती. ही हिंदू लोकसंख्या २०११ सालच्या जनगणनेनुसार आता १३ लाख ७ हजार २११ इतकी आहे. यामध्ये ६ लाख १६ हजार २५४ पुरुष आणि ६ लाख ९० हजार ९५७ महिलांचा समावेश आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार एकूण मुस्लिम लोकसंख्या १ लाख ७५ हजार ६७२ होती. त्यामध्ये ८२ हजार ५१९ मुस्लिम पुरुष, तर ९३ हजार १५३ महिलांचा समावेश आहे. त्यानंतर सन २०११ च्या जनगणनेनुसार मुस्लिम लोकसंख्या १ लाख ८७ हजार १९७ झाली आहे. यामध्ये ८७ हजार ८६४ पुरुष तर ९९ हजार ३३३ महिला आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात बौद्ध समाजाची लोकसंख्या सुद्धा कमी झाली आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात १ लाख २० हजार ८५५ बौद्ध लोकसंख्या होती. सन २०११ च्या जनगणनेनुसार या समाजाची लोकसंख्या १ लाख १३ हजार ४६७ इतकी झाली आहे. या आकडेवारीनुसार बौद्धजनसंख्या ७ हजार ३८८ ने कमी झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ख्रिश्चन लोकसंख्या आधीच कमी आहे. सन २००१ च्या जनगणनेत नोंदवली गेलेली २ हजार ८६६ ख्रिश्चन लोकसंख्या २०११ च्या जनगणनेत १ हजार ९९० इतकी झाली असून ती ८७६ ने कमी झाली आहे. शीख लोकसंख्यासुद्धा जिल्ह्यात फारच कमी आहे. सन २००१ साली जिल्ह्यात ७१२ शीख लोकसंख्या होती. ती आता पुढच्या जनगणनेत ४८२ ने कमी होऊन अवघ्या २३० वर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २००१ च्या जनगणनेनुसार ४ हजार २२७ जैन समाजाची लोकसंख्या होती. सन २०११च्या जनगणनेत जैन लोकसंख्या ८८० ने कमी होवून ३ हजार ३४७ इतकी झाली आहे. या सर्व धर्मीयांच्या व्यक्तीरिक्त इतर धर्मीय लोकसंख्येत ३१९ ने वाढ झाली आहे. सन २००१ च्या जनगणनेत १ हजार ३०८ इतर धर्मीय होते. ही लोकसंख्या आता २०११ च्या जनगणनेनुसार १ हजार ६२७ झाली आहे.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here