सावंतवाडी : भाजपा नेते व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात सातत्याने बोलणारे शिंदे गटाचे आमदार व राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आता चांगले बोलत आहे. त्याबद्दल मी त्यांचे जाहीर अभिनंदन करतो. मात्र, येणाऱ्या निवडणुकांसाठी आम्हाला ना. केसरकर यांचे मत विचारात घेण्याची गरज नाही, जो निर्णय भाजपा वरिष्ठ स्तरावरून दिला जाईल तो आम्ही अंमलात आणू, असे जाहीरपणे सांगत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ना. केसरकर यांना भाजपा विचार नसल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगून टाकले.

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा जिल्हा कार्यकारीणीची बैठक बुधवारी सावंतवाडी वैश्य भवन सभागृहात झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. तेली म्हणाले, गेली बरीच वर्षेना. केसरकर हे राणे कुटुंबीयांच्या विरोधात सतत बोलत होते. मात्र, आता शिंदे गट आणि भाजपची युती झाल्यानंतर त्यांनी राणेंबद्दल चांगले बोलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी मी त्यांचे जाहीर अभिनंदन करतो.

लोकसभा निवडणुकीसाठी ना. राणेंच्या नावाची चर्चा होत असली तरी त्याचा अंतिम निर्णय भाजपाचे वरिष्ठ नेते घेतील, त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. लोकसभा निवडणुकीसाठी ना. राणे उमेदवार असतील तर मी त्यांचा प्रचार करेन असे विधान नाम. केसरकर यांनी केले होते. त्याबद्दलही आम्ही त्यांचे आभार मानतो. मात्र, तरीही येत्या काळातील कोणत्याही निवडणुकांसाठी आम्हाला नाम. केसरकर यांचे मत विचारात घेण्याची गरज नाही. कारण या पुढील सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढविण्याची तयारी केली आहे. कोकणात शतप्रतिशत भाजप आम्ही नक्कीच करू, असा आम्हाला विश्वास आहे. निवडणुकीबाबत भाजपाचे वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील व त्यांचे निर्णय आमच्यासाठी अंतिम असतील, असा पुनरूच्चार त्यांनी केला. आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते तयारीला लागल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. ते कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नाहीत अशा तक्रारी आहेत. राज्यात सत्ता बदल झाले हे त्या अधिकाऱ्यांना कदाचित समजले नसावे, अशा अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधणार आहे. तसा निर्णय आजच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला आहे, असे राजन तेली यांनी सांगितले. माजी खा. नीलेश राणे, आ. नीतेश राणे जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, युवराज लखमराजे भोसले, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, संध्या तेरसे आधी उपस्थित होते.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here