
दापोली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे शिंदे गटाचे असा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्याने दापोलीत योगेश कदम समर्थकांनी आनंद साजरा केला. त्यानंतर शिवसेना दापोली शहर शाखा ताब्यात घेत असताना दोन्ही गटात राडा झाला. या वेळी ठाकरे गटाच्या मानसी विचारे यांना मारहाण झाल्याने त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर आ.योगेश कदम समर्थकांनी दापोली शहर शाखा ताब्यात घेतली आहे. दरम्यान शहर शाखेजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर दोन्ही गटाचे समर्थक पोलीस स्थानकात दाखल झाले आहेत.
या आधी देखील दापोली शहर शाखा आमदार योगेश कदम समर्थक यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या वेळी दापोली पोलिसांनी हे प्रकरण सामंजस्याने मिटविले होते. त्या नंतर या शाखेत ठाकरे गटाचे वर्चस्व होते. मात्र, शुक्रवारी रात्री आमदार योगेश कदम समर्थक यांनी ही शाखा ताब्यात घेतली आहे. दापोलीत पुन्हा एकदा दोन्ही गटात राडा झाल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या राजकीय राड्या नंतर दापोलीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र आणखी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दापोलीत चोख पोलीस बंदोबस्त आहे.
हेही वाचंलत का?