देवगड; पुढारी वृत्तसेवा : हवामानात वारंवार होणार्‍या बदलाचा फटका आंबा पिकाला बसत आहे. सध्या सनबर्नचा आघात देवगड हापूसवर झाल्याने बहुतांशी ठिकाणी आंब्यावर काळे डाग पडून आंबे खराब झाले असून यामुळे बागायतदार चिंतेत सापडला आहे.

देवगड तालुक्याची आर्थिक नाडी प्रामुख्याने आंबा व मच्छीमारी व्यवसायावर आहे. मात्र या दोन्ही व्यवसायांना हवामानात वारंवार होणार्‍या बदलाचा मोठा फटका बसत आहे. कधी अवकाळी पाऊस, तर कधी वाढता उष्मा याचा गंभीर परिणाम आंबा पिकावर होतो. त्यात थ्रीप्स, तुडतुडे यामुळे त्रस्त बागायतदार मोठ्या प्रमाणात फवारणी करून पीक वाचविण्यासाठी धडपडत असतानाच आता तापमानात झालेल्या वाढीचा फटका हापूस आंब्याला बसत आहे.

फेब्रुवारी महिन्यात एकीकडे सकाळी गारवा असताना दुपारी मात्र तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. सरासरी तापमान 35 ते 40 अंशांपर्यंत पोहोचले असून यामुळे निर्माण झालेल्या सनस्ट्रोकचा परिणाम थेट आंबा फळावर होत आहे. काळे डाग पडून आंबा खराब होत आहे. यामध्ये कोवळा आंबा भाजून गेला आहे. झाडाच्या बाहेरील बाजूस असणार्‍या आंब्यावर मोठ्या प्रमाणात असा परिणाम झाला असून याला कागदी पिशव्यांचे आवरण आंब्याला बांधणे हा उपाय असल्याचे आंबा बागायतदार विद्याधर जोशी यांनी सांगितले. मात्र कमी उंचीच्या झाडांवरच हा उपाय करणे शक्य आहेे. पहिल्या टप्प्यातील आंबा हा 10 ते 15 टक्के असून उर्वरीत आंबा मे अखेरपर्यंत होईल. सध्या 70 ते 80 टक्के झाडांना मोहर येत असून हा आंबा मे महिन्यापर्यंत होईल.

आंबा बोर्डची नोंदणी रखडली

शासनाने आंबा, काजू स्वतंत्र बोर्डाची घोषणा केली आहे. बोर्डाच्या माध्यमातून आंबा व काजू बागायतदारांचे प्रश्न शासनस्तरावर मांडता येतील. बोर्डामार्फत विविध योजना राबविता येऊ शकतात. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात स्वतंत्र बोर्ड जाहीर झाले, मात्र त्या बोर्डाचे तांत्रिक कारणामुळे रजिस्ट्रेशन झाले नाही. स्वतंत्र बोर्ड झाल्यास प्रक्रिया युनिटला प्राधान्य देऊन त्यातून मार्केटिंग होणे आवश्यक आहे.

सनस्ट्रोकमुळे पहिल्या टप्प्यातील आंबा पीक धोक्यात आले आहे. यासाठी जिथे शक्य तेथे कागदाचे आवरण आंब्याला बांधणे हा तात्पुरता उपाय आहे. रात्री कमी होणारे व दिवसा अचानक वाढणारे तापमान यांच्या तफावतीमुळे त्याचा परिणाम आंबा पिकावर होत आहे.
– जया गोसावी, सुजल अ‍ॅग्रो केअर









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here