आरवली; पुढारी वृत्तसेवा : मासे विक्री करणारी सईदा सय्यद हिच्या आव्हानात्मक खून प्रकरणात पोलिसांना यश मिळाले आहे. अतिशय गुंतागुंतीच्या ठरलेल्या या तपासात पोलिसांनी प्रचंड मेहनत आणि चिकाटीने काम करत अखेर एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. येथील पिरंदवणे परिसरातीलच हा तरुण असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या खून प्रकरणाची लवकरच उकल होणार आहे. अवघ्या ५ दिवसांत पोलिसांनी या खून प्रकरणाचा छडा लावल्याने संगमेश्वर पोलीस तसेच डीवायएसपी डॉ. सचिन बारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आरोपीच्या नावाबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.

रत्नागिरी येथील मासे विक्री करणाऱ्या सईदा सय्यद या महिलेचा मृतदेह बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी पिरंदवणे रस्त्यालगत आढळून आला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे बोलले जात होते. मात्र मृतदेहाची व घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर हा खून असल्याचा संशय संगमेश्वर पोलिसांना आला. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, चिपळूणचे डीवायएसपी डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, सचिन कामेरकर, किशोर जोयशी, अनिकेत चव्हाण, सोमनाथ आव्हाड, विश्वास बरगावे, बाबुराव खोंदल, अनिल म्हसकर, तेरवणकर, पाटील मॅडम यांनी या प्रकरणात गेले ५ दिवस प्रचंड मेहनत घेतली होती.

अतिशय निर्जनस्थळी ही हत्या झाल्याने व आरोपीने कोणतेच पुरावे मागे सोडले नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करून पोलिसांनी तपास कार्यास गती दिली होती. अखेर पाचव्या दिवशी पोलिसांनी या प्रकरणातील संशयिताला संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे येथून ताब्यात घेतले. त्यामुळे हा खून का करण्यात आला, याचे गूढ उकळणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

          हेही वाचलंत का ?

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here