रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  कांदळवन व सागरी जैवविविधता संरक्षणाच्या द़ृष्टीने किनारी भागामध्ये कांदळवन कक्ष रत्नागिरी व कांदळवन प्रतिष्ठान मुंबईच्यावतीने जिल्ह्यात बचतगटांच्या माध्यमातून 46 प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये जिताडा, कालवे, काकई पालनासोबत शोभिवंत मत्स्यपालन आणि निसर्ग पर्यटन प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्ह्यात 2019 पासून कांदळवन कक्ष व प्रतिष्ठानच्या माध्यमातून खाडीकिनारी राहणार्‍या ग्रामस्थांना सोबत घेऊन बचत गटांच्या माध्यमातून विविध प्रकल्प सुरू आहेत. गतवर्षी यातील काही बचत गटांनी कालवे, जिताडा व काकई पालन व अन्य माध्यमांतून तब्बल साडेसात लाखांचे उत्पन्न प्राप्त केले आहे.

किनारपट्टीवरील खाडी भागातील बॅकवॉटरच्या माध्यमातून कोकणातील निसर्गसौंदर्य न्याहाळता येत आहे.?जगबुडी व वाशिष्ठी नदीपात्रात आढळणार्‍या मगरींमुळे खेड सोनगाव येथे मगर सफारी सुरू करण्यात आली आहे. येथील ग्रामस्थांना बचत गटांच्या माध्यमातून एकत्र करून सुरू करण्यात आलेल्या पर्यटन सफारीलाही आता पर्यटकांचा पाठिंबा मिळत आहे. याच ठिकाणी ग्रामस्थांकडून कोकण पध्दतीने आदरातिथ्य होत असल्याने पर्यटकही भारावून जात आहेत. मगर सफारी बरोबरच विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे सौंदर्यही न्याहाळता येत असल्याने पर्यटकांसाठी ही मोठी निसर्ग मेजवानी कांदळवन प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिली आहे.
पावस येथेही निसर्ग पर्यटन प्रकल्प राबवण्यासाठी कयाक बोट खरेदी केली जाणार असून, सर्व परवानग्या प्राप्त झाल्यावर हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे.

गतवर्षी 28 बचत गटांना 7 लाख 19 हजारांचे उत्पन्न? मिळाले आहे. आंजर्ले व सोनगाव?येथील प्रकल्पातून जवळपास दोन लाखांचे उत्पन्न मिळाले. शोभिवंत मासे व अन्य माध्यमातून सर्व बचत गटांना 11 लाख 26 हजारांचे उत्पन्न मिळाले. यातून खर्च वजा करून बचत गटातील सदस्यांना पावसाळ्याचे दिवस सोडून हे उत्पन्न मिळाले आहे.

जिल्ह्यात जिताड्याचे 6, तर काकईपालनाचे 13 प्रकल्प

जिल्ह्यात सध्या जिताडा पालनाचे सहा, काकई पालनाचे 13 प्रकल्प तर कालवे पालनाचे 13 प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. तर शोभिवंत मत्स्य पालनाचे नऊ? प्रकल्प सुरू आहेत. निसर्ग पर्यटनावर आधारित आंजर्ले सोनगाव येथे पाच प्रकल्प सुरू आहेत. प्रकल्प समन्वयकांच्या माध्यमातून खाडी किनारी राहणार्‍या ग्रामस्थांना नवनवीन प्रकल्प राबवण्यासाठी प्रेरित केले जात आहे.

The post रत्नागिरीत 46 प्रकल्पांमधून स्थानिकांच्या हाताला काम appeared first on पुढारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here