
सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा : निरवडे-भंडारवाडी येथील आरव जानू खरात या 9 वर्षीय शाळकरी मुलाचा काम सुरू असलेल्या विहिरीत कोसळल्यामुळे मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी 11.30 वा.च्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल. त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी तथा बालरोग तज्ज्ञ डॉ. संदीप सावंत यांनी सांगितले. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आरव हा सकाळी शाळेतून घरी आला. त्यानंतर घरात दप्तर ठेवून आईला खेळायला जातो, असे सांगून निघून गेला. त्याच्या घरापासून काही अंतरावर विहीर खोदाईचे काम सुरू आहे. या ठिकाणावरून जात असताना त्याने विहिरीत डोकावून पहाण्याच्या प्रयत्नात पाय घसरून तो विहिरीत कोसळला. दुर्दैवाने कामगार सुट्टीवर असल्याने अर्धवट खोदलेल्या या विहिरीवर कुणीही नव्हते. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी ही घटना त्याच्या घरी सांगितली. यावेळी घरातील व्यक्तींनी विहिरीवर धाव घेत त्याला बाहेर काढले व तत्काळ निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, अधिक उपचारासाठी त्याला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय अधिकार्यांना दिला. त्यानुसार त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. विहीरीतील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.