
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचे सुरक्षा रक्षक शनिवारी रात्री गंभीररित्या जखमी अवस्थेत सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा घातपात असावा असा संशय वर्तविण्यात येत आहे. या सुरक्षा रक्षकाची प्रकृती गंभीर असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सुमित सावंत हे रत्नागिरी पोलीस दलात आहेत. सध्या ते आमदार राजन साळवी यांचे सुरक्षारक्षक म्हणून तैनात आहेत. शनिवारी (दि. ५) रात्री माळनाका ते थिबापॅलेस दरम्यान जात असताना त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सावंत यांना जबर मारहाण झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे असून रात्रीच्यावेळी हा प्रकार घडल्याने हल्लेखोर नेमके कोण होते याची माहिती मिळवणे कठीण बनले आहे.
आमदार राजन साळवी यांचे सुरक्षारक्षक सुमित सावंत यांना गंभीर जखमी अवस्थेत शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. जेलनाका ते माळनाका व थिबापॅलेस दरम्यानचे सिसिटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. शनिवारी रात्री माळनाका परिसरात एक अपघात देखील झाला होता. या अपघाताशी निगडित हा हल्ला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.