
रत्नागिरी : भालचंद्र नाचणकर : मोबाईलच्या मायाजालात गेल्या दहा-बारा वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यातील गरीब-गरजू आणि दिव्यांगांचे साडेपाच हजारांपेक्षा अधिक रोजगार कधी हिरावले गेले. सार्वजनिक दूरध्वनी केंद्राच्या माध्यमातील हे रोजगार कधी आणि कसे निसटले, याचा सुगावाच लागला नाही. आता केवळ 33 सार्वजनिक दूरध्वनी केंद्रांच्या माध्यमातून पीसीओ सुरू आहेत. यामध्ये जिल्ह्यातील 9 पैकी खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा तालुक्यांमध्ये पीसीओसुद्धा कार्यान्वित नाहीत.
जगात कुठेही एका मिनिटाच्या आत संवाद आणि संपर्क साधणारा मोबाईल किंवा भ्रमणध्वनी आता जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. 1973 च्या एप्रिल महिन्यात पहिला मोबाईल आला असला तरी 15 ऑगस्ट 1995 साली भारतातील दिल्लीत पहिला मोबाईल दाखल झाला. हळूहळू संपूर्ण देशात मोबाईलचे प्रस्थ वाढत जाऊन आता हे यंत्र जीवनाचे महत्त्वाचे अंग बनले आहे. मात्र या मोबाईलच्या येण्याने रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक दूरध्वनी केंद्रांचा अंत होत आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सन 2009-10 मध्ये 1 हजार 446 एसटीडी आणि 4 हजार 474 पीसीओ दूरध्वनी केंद्र होती. गरीब आणि दिव्यांगाना ही केंद्र चालवण्यासाठी दिली जात होती. त्यामुळे त्यांचा हा एक कुटुंब चालवण्याचा मोठा आधार होता. डाकघर अधिक्षक कार्यालयाकडून दिली जाणारी ही केंद्र सन 2016-17 मध्ये 880 वर आली. यामध्ये 115 एसटीडी तर 705 पीसीओ केंद्र होती. आता बहुतांश जिल्ह्यात मोबाईल रेंज येवू लागल्याने ही केंद्रसुद्धा कमी होऊन ती आता 33 वर आली आहेत. डाकघर अधिक्षक कार्यालयातील नोंदीनुसार मंडणगडमध्ये 2, दापोली 8, रत्नागिरी 16, संगमेश्वर 5 आणि राजापूर तालुक्यात 2 पीसीओ केंद्र आहेत. खेड, चिपळूण, गुहागर, लांजा या चार तालुक्यांमध्ये असे कोणतेही केंद्र नाही.
आजही रत्नागिरीत सर्वाधिक दूरध्वनी केंद्र
भ्रमणध्वनीमुळे वैयक्तिक दूरध्वनींचीही सार्वजनिक दूरध्वनी केंद्राप्रमाणे अवस्था झाली आहे. सन 2009-10 मध्ये 63 हजार 591 वैयक्तिक दूरध्वनी होते. ही संख्या आता 6 हजार 458 वर आली आहे. दरम्यान, बारा वर्षांपूर्वी सर्वाधिक सार्वजनिक दूरध्वनी केंद्र रत्नागिरी तालुक्यात 2 हजार 142 इतकी होती. ती आता कमी झाली असली तरी रत्नागिरीतच सर्वाधिक म्हणजे 16 इतकी उरली आहेत.