
सावंतवाडी, पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी चक्क खोटे बोलत आहेत. त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीतून उतरावे, असे आम्हाला कधीही वाटले नव्हते. त्यांनीच मुख्यमंत्री रहावे, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडावी, अशी आमची मागणी होती. परंतु, दिल्लीत चर्चा करुन मुंबईत आल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बदलली, त्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे. म्हणून त्यांचे मुख्यमंत्री पद गेले, चिन्ह व पक्षाचे नावही गेले, असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे सांगितले. ते आज (दि.७) माध्यमांशी बोलत होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेवर प्रतिक्रिया देताना मंत्री केसरकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. व आपला पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला, ही वस्तुस्थिती त्यांनी कबूल करावी आणि जनतेला सांगावे. त्यांचे मुख्यमंत्रीपद आम्ही काढलेले नाही, ते चक्क खोटे बोलून सहानुभूती मिळवत आहेत. शिवसेना पक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला. त्यामुळे त्यांच्या विचारसरणीवर चालायला हवा होता. तो चालला नाही म्हणून ही गोष्ट घडली, ही वस्तुस्थिती आहे.
पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीतील पराभवावर ते म्हणाले की, कोणाला तिकीट द्यावे, यावर वाद होते. त्यामुळे भाजपचा तेथे पराभव झाला. तरी पिंपरी चिंचवड आम्ही जिंकली आहे. शरद पवार यांच्या पक्षाला मतदारांनी धुडकावून लावले आहे. पिंपरी- चिंचवड हा गड त्यांना राखता आला नाही. राष्ट्रवादी जिंकू शकलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे केसरकर म्हणाले.
हेही वाचा