रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेले दोन दिवस तेरसे व भद्रेचे असे शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. सोमवारी रात्री मंदिराजवळील पौर्णिमेचा होम पेटवण्यात आला. त्या नंतर मंगळवारी देवाचा माड उभा करण्यात आला. रत्नागिरी शहराचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी व देवी जुगाई भेटीचा क्षण पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी झाली होती. या भेट सोहळ्यानंतर श्रीदेव भैरीबुवाच्या शहरातील ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात झाली.

जिल्ह्यात मागील दोन दिवस शिमगोत्सवाची धूम सुरू असून मोठ्या जल्लोषात गावागावांत उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यांच्यातील प्रचंड उत्साह उत्सवाची रंगत वाढवत आहेत.

रत्नागिरी शहराचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीचा पालखी सोहळा पाहण्यासाठी रात्री 12 वाजता हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. जाकीमिर्‍या-सडामिर्‍या येथील ग्रामदेवतांच्या पालखीचा भेटी सोहळा पार पडल्यानंतर रात्री 12 वाजल्यानंतर रत्नागिरीच्या बारा वाड्यांचा अधिपती श्रीदेव भैरीची पालखी भाविकांच्या जल्लोषात मंदिराबाहेर पडली.

शहरातील खालची आळी परिसरातील नागरिकांचे उलपे स्वीकारत वाजत-गाजत पालखी श्रीदेव जुगाई मंदिरात आली. या ठिकाणी मध्यरात्री जुगाई मंदिरात पालखीने प्रवेश केल्यानंतर भाविकांनी मंदिर रिकामे केले. हा भेटीचा सोहळा मध्यरात्री पार पडला. वर्षातून एकदा श्रीदेव भैरी व जुगाई देवीची भेट होते. या नंतर पहाटे श्रीदेव भैरीबुवाची पालखी शहराच्या ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. शहराच्या विविध भागांतून पालखी मार्गक्रमण करीत असताना नागरिक मोठ्या उत्साहात स्वागत करत होते. अनेक ठिकाणी पालखीसाठी रस्त्यावर मंडप व रांगोळी टाकण्यात आली होती.

मंगळवारी दुपारी झाडगाव येथील सहाणेजवळ होळीचा माड उभा करण्यात आला. यावेळी भाविकांनी ग्रामदेवतेच्या नावाने जयघोष केला. श्रीदेव भैरीबुवाचा पालखी उत्सव सोहळा रंगपंचमीपर्यंत चालणार असून, या दिवशी पालखी मंदिरात प्रस्थान करुन शहरातील शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. तर ग्रामीण भागात गुढीपाडव्याला शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here