
कणकवली; पुढारी वृत्तसेवा : हवामान खात्याने वातावरणातील बदलामुळे होळी कालावधीत अवकाळी पावसाचा इशारा दिला असतानाच गेले दोन दिवस सह्याद्री पट्ट्यात सोसाट्याचा वारा सुरू आहे. चक्रीवादळ सद़ृश असलेल्या या वार्यामुळे आंबा, काजू या फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तयार झालेल्या आंब्याच्या कैर्या आणि काजू बी वार्यामुळे गळून पडत आहे. तर मागील काही दिवस पडलेल्या थंडीमुळे आलेला आंबा, काजू वरील मोहोर गळून गेला आहे. त्यामुळे यंदा हातातोंडाशी आलेले जेमतेम आंबा, काजूचे फळपिकही वाया गेले आहे. वैभववाडी, कणकवली, कुडाळ आदी सह्याद्री पट्ट्यात गेल्या दोन दिवसांपासून चक्रीवादळ सदृश्य वारा सुरू आहे. रात्री 9, 10 वा. नंतर वारा सुरू होतो तो दुपारी 12-1 वाजेपर्यंत असतो. सोसाट्याच्या वार्याने झाडांची पाने गळून पडत आहेत. शिवाय आंब्याच्या तयार होत असलेल्या कैर्या आणि काजू बी गळून पडली आहेत. एकतर उत्पादनात मोठी घट असताना हातातोंडाशी आलेले फळपिक या वार्यामुळे हातातून गेले आहे. या वार्यामुळे पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सोसाट्याचा वारा दोन दिवस झाला होता. त्यानंतर 16-17 फेब्रुवारी असेच वारे झाले होते. आता पुन्हा सोमवार, मंगळवारपासून हे वादळी वारे सुरू झाले आहेत. विशेषतः सह्याद्री पट्ट्यात त्याचा फटका फळपिकांना बसला आहे. कृषी विभाग या नुकसानीची नोंद घेणार का? असा सवाल शेतकरी करत आहेत.