
रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : पहिल्या आणि दुसर्या टप्प्यात मोहोर येऊन फळधारणा झालेल्या हापूस आंब्याच्या पिकाला सध्या वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे. त्यामुळे तिसर्या टप्प्यातील आलेल्या मोहोरापासून आंबा उत्पादन अडचणीत येण्याची शक्यता आहे. हे उत्पादन मे अखेर किंवा जूनमध्ये येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या वर्षीचा आंबा हंगाम संकटात असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्याच्या अर्थकारणात आंबा पिकाला मोठे महत्त्व आहे; परंतु आंब्याचा या वर्षीचा हंगाम काहीसा संकटात आला आहे. या वर्षी पहिल्या टप्प्यात 15 ते 20 टक्के, दुसर्या टप्प्यात 25 टक्के, तर तिसर्या टप्प्यात 50 ते 60 टक्के मोहोर आला. पहिल्या टप्प्यातील मोहोर नोव्हेंबर-डिसेंबर, दुसर्या टप्प्यातील मोहोर जानेवारी, तर तिसर्या टप्प्यात मोहोर फेब्रुवारी महिन्यात आला. पहिल्या टप्प्यातील आंबा पुढील 20 ते 22 दिवसांत काढणीला येईल. काही भागांत काढणीला सुरुवातही करण्यात आली आहे. दुसर्या टप्प्यातील आंबा मार्च अखेरपर्यंत येईल. परंतु, फळधारणा झालेल्या आंब्याला सध्या वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपैकी आठ दिवस जिल्ह्याचे तापमान 39 अंश सेल्सिअस राहिले आहे. त्यामुळे अनेक भागांत उन्हामुळे आंब्यावर काळे डाग पडत असल्याचे चित्र आहे. पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील आंबा पिकांचे मोठे नुकसान होत असताना आता तिसर्या टप्प्यातील आंबा उत्पादनासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आंबा तयार होण्यास किमान 90 ते 105 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे आंबा मेअखेर किंवा जूनमध्ये तयार होण्याची शक्यता आहे. या कालावधीत जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे तिसर्या टप्प्यातील आंबा उत्पादनाचे नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे.
तापमानवाढीपासून आंबा पिकाचे संरक्षण करण्यासाठी जिथे शक्य आहे, तिथे फळांना पिशवीने झाकून घ्यावे. झाडांच्या मुळावर गवत, पालापाचोळ्याचे आच्छादन करावे आणि पंधरा दिवसांत तीन ते चार वेळा पाणी द्यावे,जेणेकरुन फळाचे तापमान नियंत्रिक करणे शक्य होणार आहे, अशा सल्ला कोकण कृषी विद्यापीठाने या समस्येबाबत जारी केला आहे.