रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : शाळेत जाणार्‍या तीन अज्ञान मुलींची भर रस्त्यात वारंवार छेडछाड काढणार्‍या आरोपीला आणि त्याला पळण्यास मदत करणार्‍या रिक्षा चालकाला विशेष पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी प्रत्येकी 3 वर्षे सश्रम कारावास आणि दोघांना मिळून 11 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.तर या गुन्ह्यातील दोन विधीसंघर्षित बालकांना जुवेनाईल कोर्टात हजर करण्यात आले आहे. ही घटना 1 वर्षापूर्वी लांजा येथील सुखादेवी ते सापुचेतळे चौक या परिसरात घडली होती.

हाजीबा बिरु फोंडे (वय 20, मुळ रा. बेळगाव, सध्या रा.लांजा, रत्नागिरी) आणि रिक्षा चालक चंद्रकांत बाळकृष्ण कोकरे (वय 30, रा.चांदोर, रत्नागिरी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पीडित मुलीच्या पालकांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानुसार,21 फेब्रुवारी 2022 आणि त्याअगोदर आठ दिवस या तिन्ही मुली सुखादेवी ते सापूचेतळे या रस्त्याने शाळेत येता जाताना आरोपी हाजीबा फोंडे आणि दोन विधीसंघर्षित बालके त्या मुलींशी छेडछाड करुन त्यांचा पाठलाग करायचे. या त्रासाला कंटाळून त्यातील एका मुलीने तिच्या आई-वडिलांना याची माहिती दिली. तेव्हा 21 फेब्रुवारी 2022 रोजी मुलीच्या पालकांनी पाळत ठेवली असता सायंकाळी 4 वा.मुली शाळेतून घरी येत असताना त्यांची छेड व पाठलाग करताना तिघे दिसून आले. मुलींच्या पालकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चंद्रकांत कोकरेने त्यांना आपल्या रिक्षातून पळून जाण्यास मदत केली होती.

याप्रकरणी मुलींच्या पालकांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयितांविरोधात भादंवि कलम 354 अ, ब तसेच पोक्सो कायदा कलम 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील यांनी करुन फोंडे आणि कोकरे विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.अनुपमा ठाकुर यांनी 9 साक्षिदार तपासत केलेला युक्तिवाद ग्राह्य मानण्यात आला.

याबाबत निकाल देताना विशेष न्यायाधीश वैजयंतीमाला राउत यांनी हाजिबा फोंडेला 3 वर्ष सश्रम कारावास आणि 8 हजार रुपये दंड तर चंद्रकांत कोकरेला 3 वर्ष सश्रम कारावास आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून लांजाचे पोलिस हेड काँस्टेबल नरेश कदम यांनी काम पाहिले.

अधिक वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here