कणकवली : पुढारी वृत्तसेवा : नारायण राणे यांचे कार्यकर्ते आता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मागून फिरत आहेत. त्यामुळे राणे यांचे वर्चस्व कोकणात संपताना दिसत आहे. खेड येथे झालेल्या मेळाव्यामध्ये जनतेने ठाकरे शिवसेनेचे अस्तित्व दाखवून दिले आहे. परंतु राणे यांचेच राजकीय अस्तित्व आता संपत चालले आहे. नारायण राणे यांना रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागते हीच राणे यांची राजकीय अधोगतीकडे जाण्याची वाटचाल आहे. येत्या दोन महिन्यात नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे, असा गौप्यस्फोट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आ. वैभव नाईक यांनी लगावला.

विजय भवन येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत आ. नाईक बोलत होते. यावेळी ते म्हणाले, नितेश राणे यांनी 2 हजार कोटीच्या विकास निधीची घोषणा केली आहे. याआधीही त्यांनी 800 कोटीचा एजी डॉटर्स प्रकल्प, विनोद कांबळे क्रिकेट अकादमी, अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स या ठिकाणी आणले. तशा अनेक घोषणा नितेश राणे यांनी केल्या आहेत.त्याचे पुढे काय झाले? तसेच दोन हजार कोटीचा विकास निधी हा पण त्यातीलच एक भाग आहे. याआधी घोषणा केलेल्या योजनांची पूर्तता झाली नाही आणि आता घोषणा केलेल्या 2 हजार कोटीच्या निधीचीही पूर्तता होणार नाही असा असा टोला आ. नाईक यांनी राणे यांना लगावला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी चांदा ते बांदा योजनेला मंजुरी दिली होती. तसेच त्यांनी 400 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल असे सांगितले होते. त्यातीलच 200 कोटी रुपयांच्या कामाला सुरुवात झाली आहे.आदित्य ठाकरे चांगले काम करीत असून भावी मुख्यमंत्री म्हणून ते पुढे येत आहेत. अशा व्यक्तीवर दीपक केसरकर टीका करीत आहेत. याला काय म्हणावे? असेही वैभव नाईक म्हणाले.

आ. नाईक पुढे म्हणाले,गेली 15 वर्ष आपण जिल्हाप्रमुख होतो,आपणच पक्षप्रमुखांना जिल्हाप्रमुख म्हणून नव्यांना संधी देण्याची विनंती केली होती, आपल्यावर आता राज्याच्या इतर भागाचीही जबाबदारी उद्धव ठाकरे देणार आहेत.आमचे तिन्ही जिल्हाप्रमुख सक्षम आहेत, इतर पक्षाचे सोडा राणेंचेच कार्यकर्ते आता त्यांच्याबरोवर नसून रवींद्र चव्हाण यांच्यासोबत आहेत, असा टोला आ. नाईक यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here