दोडामार्ग; पुढारी वृत्तसेवा : तिलारी घाटातील दरीत कोसळून अपघात झालेल्या वाहनांना काढण्यासाठी जात असलेल्या क्रेनलाच या घाटात अपघात झाला. या अपघातात क्रेन अंगावर पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर चालक किरकोळ जखमी झाला. जावेद इब्राहिम अत्तार (रा. आझाद नगर, बेळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अर्शफ कयामत अन्सारी (मूळ रा. मलहाना, बनकट्टा, उत्तरप्रदेश सध्या रा. आझाद नगर बेळगाव) असे जखमी चालकाचे नाव आहे. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

तिलारी घाटात अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी बेळगावहून गोव्याला माल वाहतूक करणारी महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी तिलारी घाट मार्गे जात होती. घाट उतरत असताना जयकर पॉईंट येथील अवघड वळणावर गाडी आली असता चालकाला तीव्र उतार व वळणाचा अंदाज आला नाही. परिणामी गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी संरक्षक कठडा तोडून थेट दरीत कोसळली व पलटी झाली. अपघातानंतर काही वेळाने पुणे येथून तिलारी घाट मार्गे गोव्याला फिरायला जाणार्‍या पर्यटकांच्या कारला त्याच ठिकाणी अपघात झाला. ही दोन्ही वाहने दिडशे फुटांहून अधिक खोल दरीत कोसळली होती.

अपघात झालेली महिंद्रा पिकअप गाडी काढण्यासाठी बेळगाव येथील वाजीद इब्राहिम अत्तार यांच्या मालकीच्या क्रेनला पाचारण करण्यात आले. क्रेन मालकाचा भाऊ जावेद अत्तार व चालक अर्शफ अन्सारी क्रेन घेऊन तिलारी घाटाच्या दिशेने येण्यास निघाले. दरम्यान, तिलारी घाट उतरत असताना चालकाचा क्रेनवरील ताबा सुटला व क्रेन थेट दरीत कोसळली. मात्र सुदैवाने एका मोठ्या झाडामुळे क्रेन हजारो फूट खोल दरीत कोसळण्यापासून बचावली. यावेळी क्रेन मालकाचा भाऊ जावेद याच्या अंगावरच क्रेन पडल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर चालक जखमी झाला. अपघाताची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेबाबत चंदगड पोलिसांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. क्रेनचे मालक वाजीद यांनी या अपघाताची चंदगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जावेद याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालक अर्शफ याच्याविरुद्ध चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here