
राजापूर; पुढारी वृत्तसेवा: शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरु करावी. या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनास राजापूर तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. समस्त कर्मचाऱ्यांनी राजापूर तहसील कार्यालयाच्या आवारात एकत्र येत घोषणाबाजी केली.
सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व अंशकालीन, कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी, समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सध्याची एनपीएस पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच अन्य प्रलंबित १० मागण्यांसाठी आज (दि.१४) पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला राजापूर तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
संपामुळे वर्दळ असलेली तालुक्यातील शासकीय कार्यालये ओस पडल्याचे चित्र दिसून आले. यावेळी पेंशन आमच्या हक्काची …. नाही कुणाच्या बापाची … नाहीतर खुर्च्या खाली करा… अशा घोषणांनी परिसर कर्मचाऱ्यांनी दणाणून सोडला. यावेळी कर्मचाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली.
जुनी पेंशन योजना लागू करावी, या मागणीसाठी सुरु झालेल्या बेमुदत संपामुळे तालुक्यातील शासकीय कार्यालये ओस पडली होती. संपाला जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विविध कामांसाठी आलेल्या तालुकावासीय जनतेला गैरसोयींचा सामना करावा लागला.
हेही वाचा